Kolkatta Murder Case – CBI चा तपास अंतिम टप्प्यात; DNA चाचणीतून धक्कादायक माहिती समोर

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी सीबीआयचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सीबीआयने आता या प्रकरणी मोठी माहिती दिली आहे.

गुन्ह्याच्या रात्री काय काय केलं? याचा घटनाक्रम सीबीआयने केलेल्या चौकशीदरम्यान आरोपी संजय रॉयने सांगितला होता. यानंतर आणखी ठोस पुरावे जमवण्यासाठी सीबीआयकडून मृत डॉक्टर तरुणी आणि आरोपी संजयची डीएनए चाचणी करण्यात आली होती. मृत डॉक्टर तरुणीचा डीएनए आणि आरोपीचा डीएनए जुळला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर सीबीआय आरोपीच्या इतर वैद्यकीय चाचण्या करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात कोलकाता येथे घडलेल्या या घटनेत फक्त संजय रॉय मुख्य आरोपी आहे. संजय रॉय याच्याविरुद्धच्या आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयकडे पुरावे आहेत. डीएनए अहवाल आधीच सीबीआयकडे आला असून तो आता एम्सकडे पाठवण्यात आला होता. एम्सच्या डॉक्टरांच्या समितीने डीएनए अहवालाचा बारकाईने अभ्यास केला असून अंतिम अहवाल लवकरच सीबीआयकडे पाठवला जाईल.