शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव; अजितदादांसह भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे बिनधास्त जाऊन भेटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पाडून भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे ‘बिनधास्त’पणे शरद पवार यांना दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेटले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राजकारण, समाजकारण, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा यांसारख्या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या. देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख करत संसदेच्या सभागृहात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पवार यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पवार कुटुंबातील दुरावा संपला?

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून आले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पवार कुटुंबीय आमने सामने आल्याचे पहायला मिळाले होते. मात्र, आज शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत जाऊन बसलेल्या अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. यामुळे पवार कुटुंबातील दुरावा खरंच संपला का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.