श्रेयसचा पाठीवरील शस्त्रक्रियेला नकार !

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असलेल्या श्रेयस अय्यरने सध्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी आणि वन डे मालिकेस मुकलेल्या श्रेयसला ‘बीसीसीआय’ने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता, मात्र शस्त्रक्रियेनंतर मोठी विश्रांती घ्यावी लागेल यामुळे त्याने शस्त्रक्रियेचा विचार बदललाय.

श्रेयस अय्यरला पाठीच्या दुखपतीचा वारंवार त्रास होतोय. या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथ्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. तसेच या दुखण्यामुळे यांची यंदाची आयपीएल वारीही हुकणार आहे. शिवाय त्याची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) फायनलदेखील हुकण्याची शक्यता बळावली आहे. क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, श्रेयस अय्यरने सध्या  शस्त्रक्रिया  न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी काही दिवस विश्रांती घेऊन दुखापतीवर मात करता येते काय? याचा अंदाजही तो घेणार आहे. पाठीवरील शस्त्रक्रिया खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीनेही श्रेयसच्या शस्त्रक्रियेचा निर्णय त्याच्यावर सोडला आहे.