
पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल यांच्यावर ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर अंडी फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन सिंग आणि रवी कोयल या दोघांना मंगळवारी अटक करण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा कुणाल घोष यांनी दिलेल्या तक्रारीनंतर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या आरोपीला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कुणाल घोष पक्ष कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली. घोष यांनी अंडी चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापैकी एक अंडे त्यांच्या डोक्याला लागले.
या प्रकरणाचा तपास सुरू असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे पोलिसांकडून तपासले जात आहेत. हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, याचाही शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचीही चौकशी सुरू असल्याने पुढील अटकांची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आरोपींना किरकोळ कलमे लावून सहज जामीन मिळू नये, अशी अपेक्षा कुणाल घोष यांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली. तसेच ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी यापूर्वी सीआयडीच्या तपासावेळी पंच साक्षीदार म्हणून उपस्थित असलेली व्यक्तीच नंतर या ठिकाणी हल्ला करताना दिसल्याचा आरोपही त्यांनी केला असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.




























































