कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणारा मुख्य आरोपी नराधम संजय रॉय याची आज पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली. सीबीआय आणि सेंट्रल फॉरेन्सिक पथकाने आज प्रेसिडेंसी कारागृहात जाऊन दुपारी साडेबारा ते साडेतीन दरम्यान संजयला अनेक प्रश्न विचारले. दरम्यान, आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरावर आज सीबीआयने छापा घातला. घोष यांच्या कुटुंबीयांनी तब्बल दीड तासाने दरवाजा उघडला. सीबीआयने संदीप घोष आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या 15 ठिकाणांची झाडाझडती घेतली.
एक दिवस आधी 24 ऑगस्ट रोजी संदीप घोष आणि चार डॉक्टर तसेच एका व्हॉलिंटियरची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली. घोष यांच्यावर आरजी कर महाविद्यालयातील आर्थिक घोटाळ्यांचा आरोप आहे. महाविद्यालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी घोष यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. याप्रकरणी एसआयटी तपास करत होती. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयने 24 ऑगस्ट रोजी घोष यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. संजयचा खटला लढण्यासाठी कुणीही वकील तयार नाही. त्यामुळे सियालदह कोर्टाने संजयचा खटला कबिता सरकार यांच्याकडे सोपवला आहे.
डॉक्टरांचे आंदोलन सुरूच राहाणार
आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कनिष्ठ तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या प्रतिनिधींमध्ये स्वतंत्र चर्चा झाली. आंदोलक आणि डॉक्टरांनी पश्चिम बंगालमधील रुग्णालये आणि महाविद्यालयांमध्ये पुन्हा काम सुरू करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. मात्र, प्रशासन त्यांच्या मागण्यांवर ठोस आश्वासन देण्यात अपयशी ठरल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. फक्त चर्चा झाली. पण आरोग्य अधिकाऱ्यांनीही कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही, त्यामुळे आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जॉइंट पह्रम ऑफ डॉक्टर्सचे नेते मानस गुमटा यांनी सांगितले.