कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसी आज रॅली काढणार आहे. शिवाय दोषींना पुढच्या रविवारपर्यंत फाशीची शिक्षा व्हायला हवी, यासाठी सीबीआयला अल्टिमेटम दिला आहे.
ममता बॅनर्जी या प्रकरणातील दोषिंना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी कोलकाता येथे रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून ममता सरकार दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दोषींना पुढच्या रविवारपर्यंत फाशीची शिक्षा द्यायला हवी, यासाठी आपण सीबीआयला अल्टिमेटम दिला आहे.
कोलकाताच्या या भयंकर घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. आरजी कार मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. डॉक्टरांचा आरोप आहे की, बंगाल पोलिसांनी हे प्रकरण योग्यरित्या हाताळले नाही. शिवाय या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.
या रॅलीची माहिती देत तृणमुल खासदार आणि प्रवक्ते डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले की, कोलकाच्या डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून आरोपींनी तिची निर्घृणपणे हत्या केली. हा अक्षम्य गुन्हा आहे. लोकांचा आक्रोश संपूर्णपणे समजतो आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना तिच्या कुटुंबीयांसोबत आहे. या प्रकरणावर सीबीआयने दैनिक अपडेट द्यायला हवे. या तपासासाठी पोलिसांना 17 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. हा अल्टिमेटम सीबीआयवरही लागू व्हायला हवा, असेही ते म्हणाले.