कोलकाताच्या आरजी कर रुग्णालयामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने देशभर आंदोलन सुरू आहे. कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. सीबीआय सहा दिवसांपासून संदीप घोष यांची कसून चौकशी करत आहे. दरम्यान, आरजी कर रुग्णालयाचे माजी उपाध्यक्ष अख्तर अली यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संदीप घोष यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय हा माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या सुरक्षेमध्ये सहभागी होता. तो बाउन्सर म्हणून काम करत होता, असा दावा अख्तर अली यांनी केला आहे.
संदीप घोष हे रुग्णालयातील अनेक बेवारस मृतदेह विकण्यासह अवैध कामांमध्ये सहभागी होते. घोष बांगलादेशमधून बायोमेडिकल आणि मेडीकल उपकरणांची तस्करी करायचे. याबाबत विजेलेंस कमिटीकडे तक्रारही केली होती. तपासही सुरू होता. मात्र अखेरचा अहवाल दिल्याच्या दोन तासानंतर आपली बदली करण्यात आली. तक्रारीनंतर संदीप घोष यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप अख्तर अली यांनी केला आहे.
बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर मुख्य आरोपी संजय रॉय याला पाहिले त्यावेळी लक्षात आले की संदीप घोष यांच्या 4 बाउन्सरपैकी तो एक होता. त्यावेळी सेमिनार रूम किंवा नर्सिंग स्टाफजवळ रात्री कोणालाही जायची परवानगी नसते. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा असते. सीसीटिव्ही कॅमेरे लावलेले आहेत. मात्र रात्रीच्या वेळी एक व्हॉलिंटिअर घुसतो आणि एवढी मोठी घटना घडते. हा एक मोठा कट असू शकतो, असे अख्तर अली म्हणाले.
मी 2007 पासून 2023 पर्यंत आरजी कर रुग्णायामध्ये कार्यरत होतो. मी अनेक प्राचार्यांसोबत काम केले आहे. मात्र मी संदीप घोष यांच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस पाहिलेला नाही. 2021 मध्ये त्याच्या नियुक्तीनंतर आरजी कर रुग्णालय उद्ध्वस्त झाले. संदीप घोष यांची नियुक्ती झाल्यानंतर पैसे कमावण्यासाठी विद्यार्थ्यांना नापास करायला सुरुवात केली. अनेकदा विद्यार्थ्यांनी त्याबाबत धरणे आंदोलन केले. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही, असे अख्तर अली यांनी सांगितले.
संदीप घोष यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. सीबीआयच्या टीमने बुधवारी सलग सहाव्या दिवशी डॉ. संदीप घोषची चौकशी केली. आतापर्यंत घोषने 64 तास तपास केला आहे. त्याचवेळी आर्थिक अनियमिततेशी संबंधित नव्या प्रकरणात डॉ. घोष यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बुधवारी त्यांना पोलिसांसमोर हजर होऊन भ्रष्टाचार प्रकरणी जबाब नोंदवायचा आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी संदीप घोष यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले होते.