अचूक उत्तर देऊनही बबिता ताडे जिंकू शकल्या नाहीत सात कोटी!

2202

अमरावतीच्या शाळेत महिना अवघा दीड हजार रुपये पगार घेऊन खिचडी शिजवणाऱ्या बबिता ताडे या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये कोट्यधीश झाल्या आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एकेक प्रश्नाची अचूक उत्तरे देत बबिता एक कोटीपर्यंत पोहचल्या. ‘एक्स्पर्ट ऍडव्हाइस’ या लाइफलाइनचा वापर करत बबिता यांनी एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले व ‘केबीसी’च्या अकराव्या पर्वात दुसऱ्या करोडपती होण्याचा मान पटकावला. यानंतर त्या सात कोटी रुपयांच्या प्रश्नाकडे वळल्या. पण त्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊनसुद्धा त्या सात कोटी रुपये जिंकू शकल्या नाहीत.

रक्कम जितकी मोठी तितकाच कठीण प्रश्न हा ‘केबीसी’चा नियम आहे, पण बबिता यांनी त्यांच्या ज्ञानाने सर्वांनाच चकित केले. त्यांच्या खेळीने बिग बीसुद्धा भारावून गेले. सात कोटी रुपयांसाठी विचारलेला प्रश्न असा होता की, ‘कोणत्या राज्यातील सर्वात जास्त राज्यपाल हिंदुस्थानचे राष्ट्रपती झाले आहेत?’ यासाठी राजस्थान, बिहार, पंजाब व आंध्र प्रदेश या चार राज्यांचे पर्याय देण्यात आले होते. बबिता त्यांच्या उत्तराबाबत ठाम नव्हत्या म्हणून त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला, पण नियमाप्रमाणे शो सोडल्यानंतर स्पर्धकाला त्या प्रश्नाचे उत्तर सांगावे लागते. तेव्हा बबिता यांनी बिहार हा पर्याय निवडला. त्यांनी हे दिलेले उत्तर बरोबर होते. त्यामुळे अचूक उत्तर देऊनसुद्धा बबिता सात कोटी रुपये जिंकू शकल्या नाहीत.

बबिता अंजनगाव सुर्जीतील पंचफुलाबाई हरणे विद्यालयात शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम करतात. त्यांचे पती सुभाष ताडे हे याच विद्यालयात शिपाई आहेत. बबिता या पदवीधर आहेत. विवाहानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्यांना प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे परीक्षा देता आल्या नाहीत, पण पुस्तकवाचनाची आवड त्यांनी कायम ठेकली. ताडे यांना एक मुलगी, एक मुलगा आहे. मुलगी पुण्याला शिक्षण घेत असून मुलगा अंजनगावातच शिकत आहे.

एक कोटीचा प्रश्न

मुगल शासक बहादूर शाह जफर याच्या दरबारातील कोणत्या कवीने ‘दास्तान-ए-गदर’ लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी 1857 च्या उठावाचे स्वानुभव कथन केले आहे. हा प्रश्न बबिता ताडे यांना एक कोटीसाठी विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरासाठी बबिता यांनी ‘एक्स्पर्ट ऍडक्हाइस’ पर्याय निवडला. जहीर देहलवी या अचूक उत्तराने बबिता एक कोटी रुपये जिंकल्या.

आपली प्रतिक्रिया द्या