कोंडीवरे परिसरात बिबट्याची दहशत वाढली, बंदोबस्त करण्याची मागणी

कोंडीवरे परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. आता बिबट्याने आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याने गेल्या रात्री एक वासरू ठार मारले. बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी कोंडीवरे ग्रामपंचायतीकडून करण्यात आली असताना वन विभाग याकडे दुर्लक्ष करून वृक्ष तोडीकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांनी केला आहे.

काही महिन्यांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथे ब्लॅक पँथरच्या दर्शनामुळे भीतीचे वातावरण होते. याच काळात बिबट्याचा वावरही वाढला होता. यामुळे कोंडीवरे ग्रामपंचायतीकडून वन विभागाला पत्रव्यवहार करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र बिबट्या रानात असल्याने त्याठिकाणी पिंजरा लावू शकत नाही असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता बिबट्या लोकवस्तीत येऊ लागल्याने शेतकरी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री कोंडीवरे केंबळेवाडीतील संतोष भुवड यांच्या मालकीचे वासरू बिबट्याने ठार मारले. संतोष भुवड यांचा गोठा लोकवस्तीत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याऐवजी वन विभागाला वृक्ष तोडीत अधिक रस असल्याचा आरोप जाकीर शेकासन यांनी केला आहे.

कोंडीवरे, बुरंबाड आणि आरवली परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून वन विभागाने कारवाई न केल्यास वन विभागाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगू, असा इशारा जाकीर शेकासन यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या