भात शेती नुकसान भरपाईवरुन स्थानिकांमध्ये नाराजी

631

भात शेती नुकसान भरपाईबाबत शासनाने यापूर्वी धोरण ठरवलेले आहे. भातशेतीला प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये म्हणजेच प्रति गुंठा 68 रुपये याप्रमाणे शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. तसेच ही नुकसान भरपाई कमाल एक हेक्टर एवढया क्षेत्रासाठी देण्यात येईल. एका गुंठयाला 420 ते 450 एवढया रुपयाचे भात उत्पादन आहे. मात्र शासनाकडून केवळ 68 रुपये प्रति गुंठा एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. ही नुकसान भरपाई उत्पादनाच्या तुलनेत केवळ 15 ते 16 टक्के असल्याने शेतक -यांकडून तीव्र नाराजीचे सूर लागले आहेत. ही शासनाकडून शेतक-यांची चेष्टा होत असल्याची तीव्र प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीच्या सुरेश भायजे यांनी सामना जवळ बोलतांना व्यक्त केली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी व परतीच्या पावसाने झालेल्या भातशेती नुकसानीबाबत 5 नोव्हेंबर पर्यंत पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना  दिले होते. भातशेती उत्पन्नाची जिल्ह्याची सरासरी 28 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. म्हणजेच प्रति गुंठयाला 28 किलो भात उत्पादन येत असल्याचे प्रशासकीय माहिती आहे. परंतु गेल्या काही वर्षात कृषी विभागाकडून प्रचार व प्रसार केल्यामुळे संकरित व सुधारीत बियाणांच्या वापराने उत्पादनात वाढ झाली आहे.

एकीकडे शेतक-यांच्या प्रति गुंठा भात उत्पादनात वाढ होत असताना या भाताच्या शासकीय खरेदीत दर 1500 ते 1600 रुपये एवढा असल्याचे कळते. म्हणजेच १५ ते १६ रुपये किलो हा शासनाचा खरेदीचा दर आहे. त्यानुसार एका गुंठयाला 420 ते 450 रुपयाचे भात उत्पादन आहे. मात्र शासनाकडून केवळ 68 रुपये प्रति गुंठा एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे. ही नुकसान भरपाई उत्पादनाच्या तुलनेत केवळ 15 ते 16 टक्के असल्याने शेतक-यांकडून तीव्र नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. एकीकडे परतीच्या पावसामुळे शेतक-यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याने शंभर रुपयाच्या नुकसानीला शासनाची केवळ 15 रुपये मदत म्हणजे ही शेतक-यांची क्रुर चेष्टा असल्याचे सुरेश भायजे यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या