दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ मासेमारी करणा-या मच्छिमारांना हवामान बदलाचा चांगलाच फटका बसला आहे. लहरी हवामानामुळे हर्णे बंदरात मासे गायब झाल्यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे मासेमारीसाठी जिल्हयात दुस-या क्रमांकाचे बंदर ओळखले जाते. अशा या बंदरात सर्व प्रकारच्या साधारणपणे सहाशेच्या आसपास मासेमारी बोटी मासेमारीचा व्यवसाय करतात. या मासेमारी व्यवसायामुळे कितीतरी जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे व्यवसाय या मासेमारीमुळे तेजीत चालतात असा हा मासेमारी व्यवसाय कधी मानवनिर्मित अशा परप्रांतीयांच्या एलईडी, पर्ससीन नेट व फास्टर नौकांनी धुमाकूळ घातल्यावर धोक्यात येतो तर कधी निसर्गातील हवामानाच्या बदलामुळे संकटात सापडतो. तसे गेल्या 8 दिवसापासून हवामानाच्या बदलाचा फटका हा येथील मासेमारांना बसला आहे. काही प्रमाणात समुद्रात वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटींना जाळयात मासळीच मिळत नसल्याने बोटी मालकांच्या अंगावर खर्च पडत आहे त्यामुळे मासेमारांनी परिस्थिती निवळेपर्यत किनाऱ्यावर बोटी लावणे पसंत केले आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात अगदी दाभोळ, बुरोंडी, आडे, उटंबर , केळशी अशा आजूबाजूच्या गावातील मिळून एक हजारच्या आसपास मासेमारी नौका मासेमारी व्यवसाय करतात. हर्णे गावात मासेमारांची मोठी वस्तीही आहे शिवाय बाजूच्या पाजपंढरी गावातील प्रत्येक घरातील लोक मासेमारी व्यवसायावर आपला उदरनिर्वाह चालवतात. समुद्राच्या काठावरील पूर्वीपासूनच पारंपरिक पद्धतीने मासेमारी व्यवसाय करत आले आहेत. या मच्छिमारांकडे ना वेगवान, ना पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या महागड्या बोटी. पारंपरिक, छोट्या बोटींच्या साहाय्याने मासेमारी करतात. अशा या येथील मासेमारी करणा-या स्थानिक मासेमारांना गेल्या आठ दिवसापासून वातावरणातील बदलांमुळे मच्छिमारांना मासे मिळत नसल्याने मच्छिमार चांगलाच अडचणीत सापडला आहे. मासळी नाही मिळाली तर धंद्यासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे ? अशी चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळेच येथील पारंपरिक मच्छीमार हवालदिल झाला आहे.