चाकरमान्यांची लूट केल्यास खासगी बसवर कारवाई, उदय सामंत यांचा इशारा

975

गणेशोत्सवासाठी खासगी वाहनाने गावी येणाऱ्यांसाठी इ-पास सक्तीचा आहे. कशेडी चेकपोस्टवर इ-पासची तपासणी केली जाईल. बोगस पास घेऊन येणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. खासगी बसचालकांना एस.टी.च्या दरापेक्षा दीडपट दर आकारता येईल त्यापेक्षा कुणी जास्त दर आकारला तर त्यांच्यावर उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिस कारवाई करतील असा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले.

एस.टी.बस वगळता अन्य वाहनांची कशेडीत तपासणी केली जाईल. 55 वर्षावरील जे प्रवासी आहेत त्यांची अॅंटीजेन तपासणी केली जाईल. चाकरमान्यांसाठी दहा दिवसांचा क्वॉरंटाईन काळ असून ग्राम कृतीदलाने गणेशोत्सवात आरतीला किती माणसे असतील. आगमन आणि विसर्जन मिरवणूकीला किती माणसे असतील याची नियमावली तयार केली आहे. त्याचे पालन केले जाईल असे सामंत यांनी सांगितले.

जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता आहे त्यावर सामंत म्हणाले की, मी उद्या जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेणार आहे. काही डॉक्टरांनी त्यांच्या रूग्णालयात कोविड वर उपचार देण्याची तयारी दर्शवली असून त्यांना सुरक्षेची हमी हवी आहे अशा डॉक्टरांच्या पाठीशी मी ठाम उभा असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवात वाहतूक टोल फ़्री करण्यात येणार असून 15 आणि 16 ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गाची संपूर्ण पहाणी मी अधिकारी वर्गा सोबत करणार आहे. तसेच 16 ऑगस्टला दुपारी रत्नागिरी तालुक्यातील पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या