
सामना प्रतिनिधी। संगमेश्वर
जन्मताच अपंगत्व आणि पूर्णतः दिव्यांग…ना बोलता येत..ना चालत येत….स्वतःच्या हाताने खाऊपिऊ शकत नाही…तरी देखील जिद्द न हरता…थेट संमेश्वर नायरी येथून चिपळूण येथे दररोज येऊन डीबीजे कॉलेज मध्ये एम ए चे शिक्षण घेऊन हंजला जविद कादरी आता पुढे पीएचडी चे स्वप्न बघत आहे…नियतीने अन्याय करून देखील त्या नियतीसमोर हात न टेकता थेट दोन हात करण्याचे हंजला चे हे धाडस वाखण्याजोगी असून तरुण पिढी समोर एक आदर्श निर्माण करणारे आहे.
नियती एखाद्यावर किती अन्याय करू शकते आणि काळ त्याची कशी थट्टा करतो याचे उदाहरण म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथील हंजला कादरी हा तरुण होय.फक्त ८ दिवसाचाच असताना त्याला ताप भरला आणि कावीळ सारख्या आजाराने घेरले या आजाराने हंजला च्या अयुष्यात जणू काळाकुट्ट अंधार आणला.तो दिव्यांग बनला.मात्र त्याने हार मानली नाही प्रचंड जिद्द आणि धाडस घेऊन तो पुढे जाण्याचा निश्चय त्याने केला होता.
लहान असतानाच वडिलांनी हंजला आणि त्याच्या आईची साथ सोडली तरी देखील हंजला खचला नाही.शिक्षण घेण्याचा निर्णय घेऊन त्याने रत्नागिरी येथील मेस्त्री हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला आणि १० पर्यंत शिक्षण घेतले.हात पूर्णतः निकामी असल्याने चक्क पायाने हंजला लिहू लागला.10 वीत पहिल्या 10 मध्ये येऊन त्याने त्याच्या अपंगत्वालाच जणू आव्हान दिले.10 वी पूर्ण करून देखील हंजला समाधानी झाला नाही.आई जवळ जिद्द धरून त्याने रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पुढील शिक्षण सुरू केले.
गेले दोन वर्षे हंजला दररोज नायरी ते संगमेश्वर आणि संगमेश्वर ते चिपळूण स्थानक आणि येथून थेट चालत डीबीजे असा प्रवास करत आहे.पहाटे ६ वाजता तो घर सोडतो.घरातून निघताना आई त्याला जेवण भरवते त्यावर तो दिवसभर राहतो. रात्री 8 वाजता घरी पोहचल्यावरच पुन्हा आई जेवण भरवते.रात्री ३ वाजेपर्यंत जागून हंजला आज ही अभ्यास करतो.
एम ए करून देखील हंजला समाधानी नाही.पुढे पीएचडी करण्याचे त्याचे स्वप्न आहे.आणि ती जिद्द देखील तो बाळगून आहे.कोणत्याही परिस्थितीत पीएचडी करून प्राचार्य होणारच असा निश्चय हंजलाने केला आहे.मात्र घरची परिस्थिती बेताची आहे.घरातून पीएचडी करण्यासाठी विरोध आहे.मात्र हंजला आपली जिद्द सोडण्यास तयार नाही.आई मोलकरीण चे काम करून घर संभाळते आहे.हंजला ला एक भाऊ आणि एक बहीण देखील आहे.दिव्यांग आणि अपंगाशी थेट दोन हात करून पुढे निघालेला हंजला नवीन पिढीसाठी एक आदर्श ठरला आहे.































































