विवाहीत पुरूषाचा तरूणीवर लैंगिक अत्याचार, दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

विवाहित असल्याचे लपवून दापोलीतील एका तरुणाने 20 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला धमकी देवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार या तरुणीने दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली असून सागर सुरेश जाधव (वय 32 रा. नवशी, ता. दापोली) असे या संशयित तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मोबाईल दुकानात काम करणारा सागर जाधव याच्याशी ओळख झाल्यानंतर त्याच्याशी आपले बोलणे होत असे. एक दिवस सागरने माझ्या बँक खात्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे बँकेतून कर्ज घेतलेले पैसे तुझ्या खात्यात पाठवतो. मला जेव्हा पैसे हवे तेव्हा तू मला पैसे काढून दे असे सांगितले. माणुसकीच्या नात्याने आपण त्यास होकार दिला. यानंतर ज्या ज्या वेळी सागर माझ्याकडे पैसे मागत होता तेव्हा त्याला आपल्या खात्यातून पैसे काढून देत होते. यामुळे त्याच्याशी मैत्री वाढली. एक दिवस त्याच्या मोबाईलला रेंज नाही असे कारण देऊन त्याने माझा मोबाईल घेतला. त्यानंतर सागरने मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर मी माझ्या मोबाईलमध्ये असलेले तुझे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. यावेळी माझे फोटो तुझ्याकडे कसे आले असे विचारले असता त्याने त्याच्या मोबाईलमधून फोटो परस्पर घेतले असल्याचे सांगितले. हा प्रकार कोणाला सांगितला तर अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करून तुझ्या कुटुंबाला ठार मारेन अशी धमकी तो वारंवार देत होता. त्यामुळे घाबरुन घरात कोणालाही याबाबत सांगितले नाही. त्यानंतर त्याने आपण बाहेर जाऊन लग्न करूया असे सांगितले.

सागरच्या धमकीला घाबरून मी त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाले. 6 जुलै रोजी सागर आपल्याला दापोलीतून मुंबई येथे घेऊन गेला. बोरिवली मुंबई येथे एका हॉटेलमध्ये माझ्या मनाविरुद्ध दोनवेळा शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर सागर याने पुन्हा धमकी देत आपल्याला बोरिवलीवरून दिल्ली येथे एका खासगी बसने नेले. यावेळी तेथे सागरने एक फ्लॅट पाहिला होता. तेथे आम्ही थांबलो. परंतु त्याच दिवशी फ्लॅटच्या मालकाने आम्ही अविवाहित आहोत असे समजताच आपल्याला फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले. यानंतर सागरने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. तेथे दोन दिवस ठेवले. दुस-या दिवशी सकाळी सागरने आपल्याला उठवून आपल्याला आता लग्न करायचे आहे. तू नाही बोललीस तर तुझे फोटो व्हिडिओ व्हायरल करेन व तुला बदनाम करेन अशी धमकी देत लग्न केले. लोकेशन समजू नये म्हणून सागर मला जबरदस्तीने मुंबई ते दिल्ली तसेच दिल्ली ते मुंबई असा वारंवार प्रवास करवत होता. यानंतर आपली तब्येत खराब झाली. 19जुलै ते 19 ऑगस्टपर्यंत सागर व आपण ठाणे रेल्वे स्थानक तर कधी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानक तर कधी दादर रेल्वे स्थानक येथे राहिलो. 20 ऑगस्ट रोजी आपली तब्येत जास्तच बिघडली म्हणून सागरने आपल्याला जिल्हा रुग्णालय ठाणे येथे दाखल केले.

या हॉस्पिटलमध्ये सागरने प्रेग्नेंसी टेस्ट करायला सांगितली. परंतु आपली प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह आली. आपल्यावर उपचार करून 24 ऑगस्ट रोजी हॉस्पिटलमधून सोडून देण्यात आले. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर सागर म्हणाला की, आता आपण माझ्या घरी जाऊ. कारण तुझी तब्येत ठीक नाही. यावर 24 ऑगस्ट रोजी खेड येथे रेल्वेने घेऊन आला. येथे पोहोचल्यावर सागरने खेड दापोली बसमध्ये आपल्याला बसवले. यावेळी त्याने सांगितले की, माझे 8 वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. मी माझ्या पत्नीला सोडू शकत नाही. मी तुझी जबाबदारी घेऊ शकत नाही. तू तुझ्या मार्गाने जा मी माझ्या बायकोसोबत घरी राहणार आहे. यावेळी सागरला मी आता जाणार कुठे? मला माझ्या घरातील लोक घेणार नाहीत. मला जीव देण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही असे सांगितले. तेव्हा सागर म्हणाला की, तुला जे करायचे ते कर मी तुला सांभाळू शकत नाही असे म्हणून तो तेथून निघून गेला असे या तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. या तरुणीच्या तक्रारीनुसार संशयित सागर सुरेश जाधव याचे विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.