कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य जगासमोर येणार, संशोधनासाठी ‘वर्ल्ड हेरिटेज डेस्क’ स्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातील सडय़ांवर आढळणारी कातळशिल्पे आजही संशोधकांसाठी एक कोडे बनली आहेत. हे कोडे उलगडण्याच्या प्रयत्नांना आता वेग येणार आहे. कातळशिल्पांचे रहस्य जगासमोर आणण्यासाठी राज्य शासनाने वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन केला आहे. कातळशिल्पांचे शास्त्राेक्त पद्धतीने संशोधन करून त्यांना जागतिक वारसा म्हणून दर्जा मिळवून देण्यासाठी हा डेस्क काम करणार आहे.

कोकणातील हजारो कातळशिल्पे आद्य मानवी संस्कृतीची साक्ष देतात. या कातळशिल्पांमध्ये मानवी आणि प्राण्यांच्या आकृत्यांप्रमाणे विविध प्रकारची सांकेतिक चिन्हेही आढळतात. त्यांचा नेमका अर्थ अजूनही कुणाला उमगलेला नाही. आतापर्यंत जो अर्थ लावला जातोय तो केवळ अंदाजावर आहे. कातळशिल्पे कोरण्यामागे काही ना काही निमित्त किंवा गुपित असावे असे संशोधकांना वाटते. आद्य ऐतिहासिक काळातील मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी या कातळशिल्पांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. त्या कार्याला वर्ल्ड हेरिटेज डेस्कमुळे गती मिळणार आहे.

ड्रोनद्वारे छायाचित्रण आणि व्हिडीओ

कातळशिल्पांचे प्रत्यक्ष शास्त्राेक्त सर्वेक्षण, जीपीएस आधारित नकाशे, ड्रोनद्वारे छायाचित्रण व व्हिडीओ दस्तावेजीकरण रत्नागिरी शाखेतर्फे केले जाणार आहे. स्थानिक परंपरा, लोककथा आणि स्थाननामांचा अभ्यास व संकलन करून सांस्कृतिक संदर्भही नोंदवले जातील. नैसर्गिक किंवा मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱया नुकसानीचे मूल्यमापन करून संवर्धनासाठी शिफारसी देण्याची जबाबदारीही या शाखेवर असेल. त्यासाठी स्थानिकांशी संवाद साधून जनजागृतीही केली जाणार आहे. मुंबईच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक या प्रकल्पाचे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

अद्ययावत माहितीकोष 

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने वर्ल्ड हेरिटेज डेस्कस्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता दिली असून या प्रकल्पासाठी 14 कोटी 62 लाख 32 हजार 671 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई आणि रत्नागिरी अशा त्याच्या दोन शाखा आहेत. देशातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कातळशिल्पांवरील साहित्याचा सखोल आढावा घेणे, ऐतिहासिक नकाशे व उपग्रह प्रतिमांच्या सहाय्याने तांत्रिक अभ्यास करणे आणि कातळशिल्पांचा अद्ययावत माहितीकोश तयार करणे ही मुंबई शाखेची प्रमुख कामे असतील. संशोधन लेखन, जागतिक परिषदांसाठी सादरीकरणे आणि धोरणात्मक अहवाल तयार करण्याचे कामही या शाखेकडे सोपविण्यात आले आहे.

निधी आणि कार्ये

प्रकल्पांतर्गत वैज्ञानिक चाचण्या आणि सहकार्य – 6 कोटी 38 लाख 22 हजार रुपये

मनुष्यबळ – 2 कोटी 94 लाख 66 हजार 792 रुपये

उपकरणे व पायाभूत सुविधा – 2 कोटी 60 लाख 50 हजार रुपये

10 टक्के प्रशासकीय अधिभार – 1 कोटी 32 लाख 93 हजार 879.