
रत्नागिरी जिल्ह्यात आज मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. खेड, चिपळूण,संगमेश्वर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. विलवडे येथील मांडवकर वाडी बोगद्या समोर रूळावर दरड कोसळल्याने गेले दोन तास वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दोन तासांपासून रेल्वे सेवा ठप्प असल्याने एकामागोमाग रेल्वेच्या रांगा लागल्या आहेत.
मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करत आहे. त्यामुळे राज्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. गेले काही दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अवकाळी पाऊस कधीही बरसू शकतो अशी स्थिती होती. आज मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काळ्या ढगांनी आकाशात दाटी केली होती. त्यामुळे पाऊस केव्हाही कोसळू शकतो असे वातावरण तयार झाले होते.
अखेर आज मंगळवारी दुपारी 2 नंतर अवकाळी पावसाने ढगांच्या गडगडाटासह जोरदार आगमन केले. वादळी वाऱ्यासह अचानक बरसलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडवली. सध्या मे महिना सुट्टीचा महिना असल्याने बरेच चाकरमनी आपल्या गावी आले आहेत. खरेदीसाठी चाकरमान्यांची बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. अशातच पावसाने आज मंगळवारी दुपारी जोरदार आगमन केल्याने अनेकांची धावपळ उडाली