
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने) गेले नऊ दिवस रत्नागिरी शहरातून परिवर्तन पदयात्रा काढून अनेक समस्यांना वाचा फोडली. या पदयात्रेची राजिवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात सांगता झाली. शहरातील खड्डेमय रस्ते, कचऱ्याचे ढिगारे, गटरांची दयनीय अवस्था, अपुरा पाणीपुरवठा, मोकाट गुरे, भटके कुत्रे आणि बंद पथदिप असे अनेक प्रश्न नागरिकांनी मांडल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते,माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले.
कार्तिक एकादशीच्या दिवशी ग्रामदैवत श्री भैरी मंदिर येथून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या परिवर्तन पदयात्रेला प्रारंभ झाला.या पदयात्रेने शहरातील वातावरण ढवळून निघाले. पदयात्रेतून शहरातील अनेक समस्यांना वाचा फुटली त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाचे धाबे दणाणले आहेत. आज सकाळी कर्ला ते राजिवडा दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. राजिवडा येथील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात दर्शन घेऊन हर हर महादेवाचा जयघोष करण्यात आला. यावेळी उपनेते माजी आमदार बाळ माने,तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे,शिवानी सावंत-माने,माधवी माने,उपशहरप्रमुख नितीन तळेकर, माजी सरपंच दीपक सुर्वे, मिहिर माने, विराज माने, मयुरेश्वर पाटील, अमित खडसोडे, बिपीन शिवलकर, राजश्री शिवलकर, हिना दळवी, प्रकाश सुर्वे व इतर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी एकदा पायी फिरावं
शहरातून आम्ही पदयात्रा केली तेव्हा अनेक समस्यांना वाचा फुटली. शहर आजही पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. खड्डेमय रस्ते, कचरा, अपुरा पाणीपुरवठा, बंद पथदीप असे अनेक प्रश्न आहेत.स्वर्गीय डॉ.ज.शं. केळकर हे नगराध्यक्ष असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम उभारले होते. आज त्याची दुरावस्था झाली आहे.ते काम पूर्ण करू शकले नाहीत. 64 कोटी रूरयांच्या नळपाणी योजनेचा बट्याबोळ केला.त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी वातानुकूलित गाडीतून फिरण्यापेक्षा कधीतरी पायी फिरावे मग त्यांना शहरातील समस्या जाणवतील.चार वेळा मला पराभूत केले सांगता हा तुमचा अहंकार आहे अशी टीका बाळ माने यांनी केली.रत्नागिरी शहरात पदयात्रे दरम्यान रस्ते,कचरा,पाण्यासंदर्भात अनेक समस्या आढळून आल्याचे शिवानी सावंत- माने यांनी सांगितले.


























































