
कोकण प्रवासातील वेळ वाचावा यासाठी 1 मार्चपासून सुरू झालेल्या एम टू एम रो-रो फेरी सेवेपुढे पाचव्याच दिवशी विघ्न उभे ठाकले. विजयदुर्ग येथून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एम टू एम प्रिन्स जहाज मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी मालवाहतूक करणाऱ्या एका छोटय़ा टग बोटीने जहाजाला धडक दिली. त्यामुळे जहाज माघारी घेण्यात आले असून रो-रो सेवा तूर्त बंद करण्यात आली आहे.
अपघातग्रस्त बोटीला चार ठिकाणी होल पडले असल्याची माहिती आहे. संबंधित बोट विजयदुर्ग बंदरातच दुरुस्तीच्या कामासाठी थांबवण्यात आली आहे. आज गुरुवारच्या प्रवासासाठी सुमारे 20 प्रवासी आणि 7 वाहनांची बुकिंग झाली होती; मात्र सेवा बंद राहिल्याने प्रवाशांना माघारी फिरावे लागले.
प्रवाशांचा संताप
बोटीतील काही प्रवासी व कर्मचाऱ्यांनी देवगडमध्ये येत खासगी बसेसचा आधार घेत मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, गुरुवारी दुसऱ्या फेरीतच रो-रो बोटीला लागलेल्या ग्रहणामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, प्रवाशांना खासगी वाहनातून मुंबईच्या दिशेने जाण्याच्या सूचना संबंधित विभागाने दिल्या आहेत.



























































