कोपरगावात आठशे वर्षाची परंपरा जपत बैलपोळा साजरा

कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानने बांधलेल्या कोपरगाव वेशीवर फुलांचे तोरण,रांगोळी सजावट करण्यात आली होती.तुतारी सनई-चौघड्यांचे स्वर,गायक दौलतभाऊ शिरसाठ यांचे शिवभक्ती गीत अशा प्रसन्न वातावरणात शेकडो वर्षांची पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे. प्रारंभी सोमेश्वर महादेव देवस्थान येथे परंपरागत पध्दतीने अभिषेक पुजा आणि आरती संपन्न झाली. ग्रामदैवत हनुमान, गावचे मुख्य वेश व बैलजोडी पुजन करण्यात आल्यानंतर पोळा फोडण्यात आला.

गोदावरी नदीच्या तीरावर वसलेल्या कोपरगावची जहागिरी श्रीमंत पवार सरकार यांच्याकडे होती. त्यांनी सतराव्या शतकात कोपरगाव नगरीचे प्रवेशद्वार अर्थात “कोपरगाव वेस”बांधली आहे. तेव्हापासून श्रीमंत महामहीम पवार सरकार यांच्या जहागिरीमुळे बैलजोडीचा श्रावणी बैलपोळा सणाला मानाचे स्थान होते. श्रीमंत पवार सरकार यांचे बैलजोडीला आकर्षक बाशिंग, सुंदर नक्षीकाम असलेली झुल असे सजवलेली मानाची बैलजोडी त्याकाळी कोपरगावकरांसाठी आकर्षण होती. आजही त्याच परंपरागत पद्धतीने पारंपरिक वाद्य वाजविणे. वेशीचे पुजन करणे , त्यानंतर बैलाने पायाने नाडा तोडून वेशीतून आत प्रवेश केल्यावर पोळा फुटला असे मानले जात असे. त्या मागोमाग गावकऱ्यांची सजवलेली बैल वेशीतून जात असे. या दिवशी मानाच्या बैलजोडी पुजन, नेवेद्य आणि शेतकऱ्याचा सन्मान केला जात असे. बैलपोळा फोडण्याची सुरू झालेली ही परंपरा गेल्या आठशे वर्षापासून आजही कोपरगावकरांनी जशीच्या तशी जपली आहे कोपरगांवच्या पोलिस पाटील घराण्याकडे श्रीमंत पवार सरकार संस्थानचा परंपरागत कारभार आहे.