
सायबर गुन्हेगारी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच फटका कोपरगाव तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्याला बसला आहे. मोबाईल हॅक करून तब्बल चार लाख रुपये भामट्याने लंपास केले आहेत.
अक्षय मच्छिंद्रनाथ वाकचौरे (वय 25) असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. पीडित शेतकऱ्याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, 29 जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास भामट्याने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अक्षय यांच्याशी संपर्क साधला. युनियन बैंक ऑफ इंडीया एपीके अॅफ्लीकेशनद्वारे अक्षयचे आधारकार्ड व एटीएम कार्डची संपूर्ण माहिती घेतली व त्यांचा विश्वास संपादीत केला. त्यानंतर अक्षयचा मोबाईल त्याने हॅक केला आणि अक्षयच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने चार वेळा एकूण 3 लाख 94 हजार 700 रुपये काढून घेतले. खात्यातून अचानक पैसे गेल्यामुळे अक्षय यांनी ताबडतोब बँकेत जाऊन पडताळणी केली असता फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करीत आहेत.