
दोन दिवसांपूर्वी कोसळेल्या पावसामुळे कुडाळ काळपनाका येथील सर्व्हिस रोडचा भराव खचला आहे. त्याठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. या सर्व्हिस रोडचा भराव वाहून गेल्यामुळे तेथे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्यावेळी या खड्ड्याचा वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने मोठ्या अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे. मोरीच्या कठड्याला लागूनच भराव खचला आहे. तसेच सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने या रस्त्याच्या कडा असुरक्षित बनल्या आहेत.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कुडाळ काळपनाका येथे बॉक्सवेल बांधण्यात आले आहेत. या बॉक्सवेलच्या दोन्ही बाजूंना साqव्र्हस रोड करण्यात आले आहेत. मात्र भंगसाळ नदी व बॉक्सवेल दरम्यानच्या दोन्ही सर्व्हिस रस्त्यांलगत सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीही आवश्यक उपाययोजना ठेकेदाराने केलेली नाही. हे दोन्ही रस्ते डांबरीकरण करून सुस्थितीत करण्यात आले आहेत. या दोन्ही रस्त्यांच्या लगत ओहोळ व मोठा सखल भाग असल्याने तेथे संरक्षक पाईप अथवा रोलिंग बसविणे गरजेचे असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तेथे मायनर ब्रीजचा कठडाही असून सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे काळपनाका येथून भंगसाळ नदीच्या दिशेने महामार्गावर जोडणाऱ्या एका बाजूच्या साqव्र्हस रस्त्याचा भराव खचला आहे. तेथील मोरीच्या कठड्याला लागूनच मोठ्या प्रमाणात भराव खचल्याने तेथे भगदाड पडले आहे. पावसाळ्यात महामार्गावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसल्याने पाणी महामार्गावरून सर्व्हिस रस्त्यावरूनच वाहत असते. त्यामुळे एका बाजूच्या साqव्र्हस रस्त्याचा भराव वारंवार पावसाळ्यात खचत असतानाही संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी या सखल भागात मोटरसायकल कोसळली होती मात्र सुदैवाने मोटरसायकलस्वार बचावला. त्याला किरकोळ दुखापत झाली.
दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या पावसामुळे या सर्व्हिस रस्त्याचा भराव वाहून गेल्यानंतर तेथे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रस्त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून वारंवार केली जात आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारक व नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.




























































