कुलभूषण जाधव यांना वकील द्या! पाकिस्तानी न्यायालयाला उपरती

393

हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हिंदुस्थानने वकील द्यावा अशी उपरती आज पाकिस्तानच्या न्यायालयाला झाली. हिंदुस्थानी अधिकार्‍यांना आपला पक्ष मांडण्याची संधी दिली पाहिजे अशी मखलाशीही न्यायालयाने केली.

हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना 2016 मध्ये पाकिस्तानने अटक केली. जाधव यांच्याकर लष्करी न्यायालयात खटला चालवून लगोलग त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेच्या विरोधात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आवाज उठवला. पाकिस्तानने जाधव यांना दुतावासाची मदत दिली नाही, त्यांना कुटुंबाला भेटू दिले नाही. हा जीनिव्हा कराराचा भंग असल्याचे हिंदुस्थानने सप्रमाण सिद्ध करताच पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती देतानाच त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश पाकिस्तानला दिले.

हिंदुस्थानी मुत्सद्दी अधिकारी दोन केळा कुलभूषण जाधव यांना भेटले. परंतु दोन्ही वेळेस पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांचा गराडा असल्यामुळे जाधव यांनी मौनच बाळगले. वकीलपत्रावर स्वाक्षरी घेण्यासही पाकिस्तानी अधिकार्‍यांनी विरोध केला. कुलभूषण जाधव यांनी फाशीच्या शिक्षेविरोधात अपील करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानची कोंडी झाली. हिंदुस्थानने जाधव यांना वकील द्यावा अशी याचिका पाकिस्तानने उच्च न्यायालयात दाखल केली. आज या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना दुतावासाची कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात यावी तसेच हिंदुस्थानने त्यांना वकील द्यावा असा निकाल दिला.

आपली प्रतिक्रिया द्या