
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपसोबत मैत्री टिकवली असती, तर आता मी मुख्यमंत्री असतो, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. काँग्रससोबत आघाडी करून 12 वर्षांत आपण जे कमावले होते, ते सर्व गमावले आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर आरोप केले आहेत.
2006-07 या काळात मुख्यमंत्री असताना आपण जनतेचा विश्वास संपादन केला होता. जनतेचा आपल्यावर आतापर्यंत विश्वास होता. मात्र, काँग्रेसशी आघाडी केल्यानंतर जनतेचा आपल्यावरील विश्वास कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसशी 2018 मध्ये आघाडी केल्यावर सिद्धरामय्या आणि त्यांच्या गटाने आपली प्रतिष्ठा धुळीत मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. एच.डी. देवेगौडा यांच्या सल्ल्यानुसार आपण काँग्रेसशी आघाडी केल्याने आपण काँग्रेसच्या जाळ्यात अडकल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या आघाडीसाठी आपण देवेगौडा यांना दोष देत नाही. धर्मनिरपेक्षतेसाठीची त्यांची तळमळ आपण जाणून आहोत, त्यासाठीच त्यांनी आघाडी करण्याचा सल्ला दिला होता, असे कुमारस्वामी म्हणाले. धर्मनिरपेक्ष विचारांसाठी आपण त्यांचा सन्मान आणि आदर करत असल्याचेही ते म्हणाले.
2018 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला काँग्रेसचा डाव कळला होता, त्यामुळे झालेल्या चुकीसाठी महिनाभर आपण अश्रू ढाळल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपने 2008 मध्ये आपले जेवढे नुकसान केले, त्यापेक्षा 2018 मध्ये काँग्रेसने जास्त नुकसान केल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसशी आघाडी करून आपण सर्व गमावल्याचा आरोप त्यांनी केला.
सिद्धरामय्या यांचा पलटवार
कुमारस्वामी यांच्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पलटवार केला आहे. कुमारस्वामी खोटे बोलण्यात पटाईत आहेत. ते परिस्थितीनुसार राजकारणाचा फायदा घेण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी खोटे बोलतात, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. कुमारस्वामी यांच्या जनता दला सेक्युलरला फक्त 37 जागा असतानाही, आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिले, ही आमची चूक झाली काय, असा सवालही त्यांनी केला आहे.
























































