
प्रेमाला वयाचे बंधन नसतं म्हणतात ते काही खोटं नाही. पन्नाशी, साठी ओलांडलेल्या अनेक लोकांनी लग्न केल्याचे आपण पाहिले असेल. अर्थात अशी लग्न दुर्मीळच म्हणावी लागतील. वयाच्या साठीनंतर पुन्हा एकदा संसाराची स्वप्ने पाहणे किंवा जोडीदाराची साथ शोधणे ही बाब आजही आपल्या समाजात चर्चेचा विषय ठरते. मात्र मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आणि वकील म्हणून कार्यरत असलेल्या अभिनेत्री कुनिका सदानंद (वय – 62) यांनी आपल्या भविष्यातील प्लॅनबाबत बिनदास्त विधानं केली आहेत.
कुनिका सदानंद सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. बिग बॉस 19 मुळे त्यांच्या कारकिर्दीला पुन्हा एकदा नव्याने कलाटणी मिळाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या नात्यांबद्दल आणि भविष्यातील लग्नाच्या प्लॅन्सबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. साठी ओलांडल्यानंतरही त्यांना पुन्हा नवरी व्हायचे आहे.
कुनिका यांच्या आयुष्यात आतापर्यंत 6 महत्त्वाची नाती राहिली आहेत. यात दोन लग्ने, दोन लिव्ह-इन रिलेशनशिप आणि दोन शॉर्ट टर्म रिलेशनशिपचा समावेश आहे. आपल्या समाजात ही मुभा फक्त पुरुषांना दिली जाते, पण स्त्रियांनाही स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे, असे त्यांनी ‘फिल्मीज्ञान’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
एकेकाळी कुनिका आणि प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचे नाते प्रचंड चर्चेत होते. त्या अनेक वर्षे कुमार सानूंसोबत लिव्ह-इनमध्ये होत्या. बिग बॉसमध्ये बोलताना त्यांनी याबाबत खुलासा केला होता. कुनिका एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात होत्या, परंतु त्यांना तिथे फसवणूक सहन करावी लागली. तसेच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यापूर्वी कुनिका यांची दोन लग्ने झाली होती, जी दुर्दैवाने टिकली नाहीत. त्यांना अरिहंत कोठारी आणि अयान लाल ही दोन मुले आहेत. सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करताना आणि त्यांची कस्टडी मिळवण्यासाठी कुनिका यांना मोठा कायदेशीर लढा द्यावा लागला होता.
कुनिका सदानंद आजही प्रेमाच्या शोधात आहेत. मला आजही प्रेम करायला आवडेल, फक्त आता मला एक सॉलिड कमिटमेंट हवी आहे, असे त्या सांगतात. ज्या दिवशी आवडीचा जोडीदार मिळेल, त्या दिवशी वयाच्या या टप्प्यावरही पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्यास कुनिका तयार आहेत.


























































