कुर्ल्यात भंगारांच्या गोदामांना भीषण आग, अग्निशमन दलाच्या जवानासह स्थानिक जखमी

कुर्ल्यात बुधवारी दुपारी भंगाराच्या गोदामांना लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानासह एक स्थानिक जखमी झाला. दोघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठय़ा प्रमाणात गोदामांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण समजू शकलेले नाही.

कुर्ला-सीएसटी मार्गावरील किस्मतनगरच्या पाईप गल्लीमध्ये स्पेअरपार्टच्या भंगाराची दुकाने आणि त्याच्या पाठीमागे असलेल्या गोदामांना दुपारी सव्वा चारच्या सुमाराला आग लागली. आग काही क्षणात भडकून आगडोंब उसळला. धुराचे लोट पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली. दुपारी सव्वाचार वाजता लागलेली आग 5 च्या सुमाराला आणखी भडकली. अग्निशमन दलाने तात्काळ कार्यवाही करत 13 फायर इंजिन, 11 जंबो वॉटर टँकरच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. चिंचोळ्या गल्ल्या असल्यामुळे आग नियंत्रणात आणताना जवानांना अडचणींचा सामना करावा लागला. अखेर अग्निशमन दलाने तब्बल तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. यात अग्निशमन दलाचे जवान किशन चव्हाण (40) तसेच एक स्थानिक जखमी झाले असून त्यांच्यावर कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात सुरू आहे.

स्थानिकांची मिनी फायर स्टेशनची मागणी

कुर्ला-सीएसटी रोडचे रुंदीकरण करावे तसेच इथे मिनी फायर स्टेशन उभारावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज रुंद रस्ते आणि मिनी फायर स्टेशन असते तर आगीवर लवकर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असते, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष – महापौर

आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल वेळेवर पोहोचले. मात्र, अरुंद गल्ल्यांमुळे त्यांना आत शिरता आले नाही. त्यामुळे आग पसरली. कलेक्टरच्या जमिनीवर ही बांधकामे आहेत. त्याबाबत बैठकही झाली आहे. मात्र, कारवाईबाबत कलेक्टर गंभीर नाहीत, असा आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला. दरम्यान, या विभागात मिनी फायर स्टेशनची मागणी होत आहे त्याप्रमाणे ते उभारण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या