
सामना प्रतिनिधी । मालवण
ओझर खैदा येथे एका खाजगी विहिरीत रहाटाच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रदीप विठ्ठल बुरकुंडे वय २० रा. कुंभारमाठ, मालवण (मूळ रा. परभणी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मालवण पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
ओझर खैदा मार्गावरील कवटकर यांच्या जागेतील खासगी विहीर आहे. कवटकर यांच्या घराची देखभाल चौगुले कुटुंबीय करत असून चौगुले यांची मुलगी शनिवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेली असता तिला प्रदीप बुरकुंडे याचा मृतदेह विहिरीच्या रहाटाच्या दोरीला लटकताना दिसून आला. यामुळे भयभीत झालेल्या मुलीने आरडाओरडा करत याची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. याबाबतची माहिती मालवण पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विहिरीबाहेर काढला. यावेळी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस शेखर मुणगेकर, सुनील वेंगुर्लेकर, अमोल महाडिक आदी उपस्थित होते.
प्रदीप विठ्ठल बुरकुंडे हा युवक मालवणात कामानिमित्त वास्तव्यास होता. प्रदीप बुरकुंडे रोजंदारीची कामे करून आपला उदरनिर्वाह करत होता. अलीकडेच त्याने राहण्यासाठी कुंभारमाठ येथे भाड्याने खोलीही घेतली होती. कामानिमित्त प्रदीप याचा मालवणसह ओझर भागातही संचार होता, अशीही माहिती यावेळी मिळाली.





























































