जंगलातून, महामार्गावरून पायी निघालेल्या 28 जणांना पोलीस दलाने केली गावी जाण्यासाठी मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलातून पायी चालत आलेले मध्यप्रदेशचे 26 मजूर तसेच कर्नाटकातून पायी चालत आलेल्या उत्तरप्रदेशच्या दोघाजणांना कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या गावी पोहचविले.

11 मे रोजी सिंधुदुर्गमधून जंगलातून चालत मध्यप्रदेशचे 26 मजूर राष्ट्रीय महामार्गावरुन जात असल्याचे पोलिसांना आढळले. तर उत्तर प्रदेशचे 2 मजूरही कर्नाटकमधून महामार्गावरून चालत जात होते. या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस दलातर्फे चालवत असलेल्या फार्मसी कॉलेज उजळाईवाडी विमानतळ रोड येथील निवारा गृहांमध्ये दाखल केले होते. येथे त्यांची खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशच्या दोन मजुरांना रेल्वेने त्यांच्या राज्यांमध्ये आज रवाना करण्यात आले. तसेच मध्यप्रदेशच्या 26 मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मध्यप्रदेश हद्दीपर्यंत रवाना करण्यात आले. या मजुरांकडून पोलीस दल आणि महाराष्ट्र शासनाची ऋतज्ञता व्यक्त करण्यात आली.