लडाखमध्ये चीनची पुन्हा दादागिरी, सीमाभागात हिंदुस्थानी जवानांनाच आडकाठी

786

केंद्र सरकारने लडाखला केंद्रशासीत प्रदेश घोषित केलेला असतानाच येथील लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलच्या (एलएसी) जवळ चिनी सैन्याने पुन्हा आपली दादागिरी सुरू केली आहे. येथे त्यांनी बांधकाम सुरू केल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे.

संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, चीनच्या सैनिकांनी येथे तंबू ठोकले असून गस्तही वाढवली आहे. चिनी सैन्याने येथे काही बोगदे खणले असून आणखीही काही बोगद्यांचे काम येथे सुरू केले आहे. यामुळे या सैनिकांनी चक्क हिंदुस्थानी जवानांनाच येथे येण्या-जाण्यापासून आडकाठी करायला सुरुवात केली आहे. हिंदुस्थान आणि चीन यांच्यामधील पेंगगाँग लेक भागात सीमारेषा स्पष्ट नसल्याने दोन्ही देश त्यावर आपला हक्क सांगत आहेत. मात्र चिनी सैनिकांनी येथे तळच ठोकल्यामुळे हे ठिकाण त्यांचेच होऊन बसतेय की काय अशी चिंता हिंदुस्थान सरकारला लागली आहे.

काय आहे प्रकरण?
लडाखमधील पेंगगाँग लेकचा दोन तृतीयांश भाग चीनचा कब्जा असलेल्या तिबेटमध्ये आहे, तर बाकीचा भाग हिंदुस्थानी सीमाभागात आहे. 134 किलोमीटर लांबीच्या या सरोवराच्या उत्तरेकडे हिंदुस्थानी सैनिकांचा वावर चिनी सैनिकांना खटकू लागला आहे. याच वर्षी सप्टेंबरमध्ये चिनी सैनिकांनी लडाखच्या उत्तरेकडे घुसखोरी करत तंबू ठोकले आहेत. मात्र दोन्ही देशांच्या फ्लॅग मिटींगनंतर चिनी सैनिक मागे हटले होते.

आपली प्रतिक्रिया द्या