लाडकी बहीण योजना चांगल्या हेतूने आणलेली नाही. मत विकत घेण्यासाठी आणली आहे. त्यामुळेच लाडकी बहीण अशा बेइमानांना मतदान करणार नाही, असे फटकारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मिंधे सरकारला हाणले आहेत. अजित पवार बारामतीत पराभूत होतील, असेही ते म्हणाले.विधानसभा निवडणूक आढावा बैठकीसाठी अकोला-बुलढाणा येथे जाण्यासाठी संजय राऊत शहरात आले होते. त्याप्रसंगी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, योजना चांगल्या हेतूने जाहीर केल्या नाहीत, फक्त मत विकत घेण्यासाठी आहे. हे पैसे त्यांच्या खिशातील आहेत का? असा सवाल करून संजय राऊत यांनी मतदान नाही केले तर पैसे माघारी घेणार, असे वक्तव्य करणार्या आमदार राणाचा समाचार घेतला. त्यांची पत्नी पराभूत झाली. तेही पराभूत होतील, असेही राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील मुंबई, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुका घ्यायला सरकार घाबरत आहे. लोकसभा निवडणुकीत नाचक्की झाली. तीच स्थिती विधानसभा निवडणुकीत सरकारची होणार आहे, त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असला तरीही निवडणूक आयोगाला निर्धारित वेळेत निवडणूक घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.
लोकसभेचा सर्व्हे अनुकूल नव्हता, महाराष्ट्राचा सर्व्हेे देखील सरकारला अनुकूल नाही. पुन्हा ठाकरे-२ सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. पैसे वाटा, मतदारांना विकत घ्यायचा प्रयत्न करा, तुम्हाला जनता धडा शिकविल, असेही राऊत म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना काँगे्रसने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, त्याचे स्वागत केले जाईल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कामगार सेनेचे सरचिटणीस जीवन कामत, बुलढाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, वसंतराव भोजने यांची उपस्थिती होती.
..तर महाविकास आघाडीच्या 25 जागा वाढतील
भाजपाने उमेदवार निवड आणि प्रचारासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकार दिले आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला असता, संजय राऊत म्हणाले, चांगली गोष्ट आहे. राज्यात प्रचारासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आले तर महाविकास आघाडीच्या 25 जागा वाढतील, असेही ते म्हणाले.