लग्नाच्या भूलथापा मारून महिलांची फसवणूक

500

लग्न जुळणाऱ्या संकेतस्थळावर आयएएस अधिकारी असल्याच्या भूलथापा मारून महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबाला दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आदित्य म्हात्रे असे त्याचे नाव आहे. त्याने आतापर्यंत 30 महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

आदित्य हा नवी मुंबईत राहतो. दीड वर्षापूर्वी त्याने लग्न जुळणाऱ्या संकेतस्थळावर नाव नोंदवले होते. त्याने आपण आयएएस अधिकारी आणि इंजिनीअर असल्याचे भासवले. त्याच्या या भूलथापांना काही महिला या बळी पडल्या. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची आदित्यने 70 हजार रुपयांची फसवणूक केली. पैसे घेतल्यानंतर आदित्यने फोन उचलणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिमंडळ 12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शिंदे, सहाय्यक निरीक्षक दराडे यांनी तपास सुरू केला. दोन महिन्यांपासून पोलीस आदित्यचा शोध घेत होते. तो नवी मुंबईत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुरुवारी पोलिसांचे पथक नवी मुंबईला गेले. तेथून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला आज अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

फसवणुकीच्या पैशातून गोव्यात करायचा मौजमजा
आदित्य हा महागड्या गाड्यांसमोर फोटो काढून तो अपलोड करायचा. त्याला महिला बळी पडायच्या. तो लग्नाच्या नावाखाली महिलांकडून पैसे घेत असायचा. पैसे घेतल्यावर तो थेट गोव्याला जायचा. तेथे कसिनोमध्ये पैसे हरल्यावर पुन्हा मुंबईत यायचा. तो महिलांकडून 70 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत पैसे ऑनलाइन घेत असायचा.

आपली प्रतिक्रिया द्या