महायुतीमध्ये सध्या प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेपेक्षा त्या योजनेचं क्रेडिट घेण्यावरून युद्ध पेटलं आहे. ज्यामुळे महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. या ‘क्रेडिट वॉर’वर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ यांनी आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी गुरुवारी आपल्या पक्षाची ‘जन सन्मान यात्रा’ नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू केली आहे.
इंडिया टुडेने या संदर्भात अजित पवार यांच्याशी संवाद साधल्यानंतर एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यावरून सध्या मिंधे गट श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावरून या योजनेचे श्रेय कोणाला जाते, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘महायुती सरकारने ही योजना आणली आहे. मी अर्थसंकल्प सादर केला. आम्ही मिळून ही योजना तयार केली.’
ते पुढे म्हणाले की, ‘आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही वेगवेगळ्या योजनांबद्दल चर्चा करतो ज्या आम्हाला राज्यात लागू कराव्यात असे वाटते. आर्थिक स्थिती जाणून घेतल्यानंतर, आम्ही कोणती योजना पुढे द्यायची याचा निर्णय घेतो’.