विनामूल्य दर्शनावरून पाकिस्तानची पलटी

1076

कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी नानक साहिबच्या गुरुद्वारात येणाऱया शीख भाविकांना पहिल्या दिवशी विनामूल्य दर्शन दिले जाईल, असे पाकिस्तानने म्हटले होते. मात्र, आता विनामूल्य दर्शन घेता येणार नाही. पहिल्या दिवशी दर्शनाला येणाऱया भाविकांना 1400 रुपये मोजावे लागणार आहेत, असे म्हटले आहे. पाकिस्तान-हिंदुस्थानला जोडणाऱया कर्तारपूर कॉरिडॉरचे शनिवारी उद्घाटन होणार आहे.

हिंदुस्थानातील शीख भाविकांसाठी पासपोर्ट लागणार नाही, असे म्हणणाऱया पाकिस्तानने आयत्या वेळी पासपोर्ट लागेल, असे सांगत हिंदुस्थानी भाविकांची तारांबळ उडवली होती. आता अशीच पलटी उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी दिल्या जाणाऱया विनामूल्य दर्शनाबाबत मारली आहे.

गुरू नानक यांच्या 550व्या जयंतीनिमित्त नानक साहिब गुरुद्वाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हिंदुस्थानच्या शीख भाविकांसाठी पाकिस्तानच्या कर्तारपूर ते हिंदुस्थानच्या पंजाबपर्यंत कर्तारपूर कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन शनिवार, 9 नोव्हेंबरला होणार आहे.

गुरुद्वारात ‘बॉम्ब’

हिंदुस्थानला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानने आणखी एक डाव रचला आहे. पाकिस्तानने नानक साहिब गुरुद्वारासमोरच 1971 सालचा निकामी बॉम्ब प्रदर्शन स्वरूपात ठेवला आहे. ‘हिंदुस्थानी हवाई दलाने हा बॉम्ब नानक साहीब गुरुद्वारावर टाकला होता. पण तो विहिरीत पडला. पण गुरुद्वारा वाचले,’ अशी बदनामकारक माहिती फलकावर लिहिली आहे.

श्री श्री रविशंकर यांनी निमंत्रण नाकारले
आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनाचे निमंत्रण पाकिस्तानने पाठवले होते. मात्र, आधीच्या नियोजित कार्यक्रमामुळे रविशंकर यांनी हे निमंत्रण नाकारले आहे. देश आणि जागतिक शांततेत रविशंकर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पाकिस्तानने त्यांना निमंत्रित केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या