
लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांनाच लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या उत्सवासाठी आकर्षक, कलात्मक आणि पर्यावरणपूरक सजावटीला भाविकांकडून विशेष पसंती मिळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लालबागच्या गणेश गल्ली परिसरात ‘उत्सवी’तर्फे पुठ्ठय़ापासून साकारलेल्या पर्यावरणपूरक सजावट आणि आरासांनी गणेशभक्तांची लक्ष वेधून घेतले आहे.
गेल्या 25 वर्षांपासून नानासाहेब शेंडकर हे पुठ्ठय़ाचा वापर करून विविध प्रकारच्या कलात्मक सजावटी तयार करत आहेत. त्यांच्या ‘उत्सवी’ या उपक्रमाच्या माध्यमातून साकारलेल्या सजावटी आणि आरसाला मुंबईतील अनेक घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पसंती मिळाली आहे. पुठ्ठय़ासारख्या पुनर्वापर करता येणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा कल्पकतेने वापर करून ‘उत्सवी’ने विविध धार्मिक, पारंपरिक देखावे आणि मखर तयार केले आहेत. पारंपरिक सजावटीला आधुनिक कलाकुसरीची जोड देत तयार केलेल्या या पर्यावरणपूरक कलाकृतींमुळे भाविक त्याकडे आकर्षित झाले आहेत.
प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर टाळण्याचा संदेश
शेंडकर यांनी वाढत्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेत सजावटीमध्ये प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळण्याचा संदेश पर्यावरणपूरक सजावटीच्या माध्यमातून दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पर्यावरणपूरक साहित्याकडे गणेशभक्तांचा कल वाढला आहे. घरगुती गणपतीपासून ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपर्यंत विविध आकारमानाच्या सजावटीच्या मागणीनुसार या कलाकृती तयार केल्या जात असल्याची माहिती शेंडकर यांनी दिली. संपर्क – नानासाहेब शेंडकर 9324804791 / 8655511100.




























































