Sikkim Landslide – सिक्कीममध्ये लष्करी छावणीवर भूस्खलन, 3 जवानांचा मृत्यू; 6 बेपत्ता

उत्तर सिक्कीममधील छातेन येथे रविवारी संध्याकाळी लष्करी छावणीवर भूस्खलनाची घटना घडली. यात तीन जवानांचा मृत्यू झाला असून, सहा जण बेपत्ता असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी दुपारी बचाव कार्य राबवत हवालदार लखबिंदर सिंग, लान्स नाईक मनीष ठाकूर आणि पोर्टर अभिषेक लखाडा यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. दुर्घटनेत चार जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे विविध ठिकाणी पर्यटक अडकले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर सिक्कीममधील लाचुंग येथील अडकलेल्या पर्यटकांच्या पहिल्या तुकडीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासन, पोलीस, लष्कर, बीआरओ, आयटीबीपी, वन विभाग, लाचुंग ड्झुम्सा, टीएएएस, एसएचआरए, चालक संघटना, इतर पर्यटन हितधारक आणि स्थानिक रहिवाशांच्या समन्वित प्रयत्नातून लाचुंग येथून पर्यटकांचे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.