दरड कोसळल्याने बिरमणी येथे दोघांचा तर पोसरे येथे तिघांचा मृत्यू; 14 जण अडकल्याची भिती

खेड तालुक्यात कोसळलेल्या ढगफुटी सारख्या पावसाचा ग्रामीण भागालाही फटका बसला आहे. तहसिलदार कार्यालयातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बिरमणी आणि पोसरे या दोन ठिकाणी दरड कोसळून काहीजण दरडीखाली दबले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. बिरमणी येथील घटनेत दोघांचा तर पोसरे येथील दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती आहे.

गेले चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत तर वीजपुरवठा खंडीत झाल्याने अनेक गावे काळोखात बुडाली आहेत. त्यातच गुरुवारी रात्री सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या बिरमणी या गावात दरड कोसळली. बिरमणी मोरेवाडी येथे कोसळल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे घडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या दुर्घटनेत तब्बल 17 जण गाडले गेल्याची भिती व्यक्त होत आहे. यापैकी 3 जणांचे मृतदेह काढण्यात मदतकार्य करणाऱ्या पथकाला यश आले असून अन्य ग्रामस्थांचा शोध सुरु आहे.

दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरमणी आणि पोसरे या दोन्ही ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी एनडीआरएफची पथके पाठविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे या दोन्ही ठिकाणी जेसीबी, रुग्णवाहिका, प्राथमोपचारासाठी लागणारे वैद्यकिय साहित्य घेऊन युवा सेनेचे पदाधिकारी आणि युवा सैनिक निघाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या