‘सैराट’नंतर आता ‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटाचा होणार हिंदी रिमेक! पोस्टरही झालं लाँच

1757

मराठी चित्रपट हे त्यांच्या उत्तम संहिता आणि अभिजाततेसाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा बॉलिवूडकरांनाही या चित्रपटांचे रिमेक करण्याचा मोह होतो. नागराज मंजुळेच्या सैराट या चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला धडक हे त्याचं एक उदाहरण. आता सैराटनंतर अजून एका मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक होणार आहे.

नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाचं पोस्टरही लाँच करण्यात आलं आहे. हा चित्रपट 2016मध्ये आलेल्या लपाछपी या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. सामाजिक व्यथांशी भयपटाशी सांगड घालणारा हा चित्रपट तिकीटबारीवरही चांगलाच यशस्वी ठरला होता. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री पूजा सावंत हिच्या अभिनयाचंही कौतुक झालं होतं.

आता याच लपाछपीचा हिंदी रिमेक बनणार असून त्याचं नाव छोरी असं असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री नुशरत भरुचा ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्यार का पंचनामा, सोनु के टिटू की स्वीटी, ड्रीम गर्ल अशा हलक्याफुलक्या धाटणीच्या चित्रपटांनंतर नुशरत प्रथमच एका भयपटात झळकत आहे. नुकतीच तिने तिच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विक्रम मल्होत्रा आणि जॅक डेव्हिस हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर दिग्दर्शनाची धुरा विशार फुरिया सांभाळणार आहे. या चित्रपटात अन्य कलाकार कोणते असतील, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या