आठ महिन्यांच्या चिमुकल्यावर लेझर शस्त्रक्रिया; मूत्रमार्गातील अडथळ्यावर ससूनमध्ये यशस्वी उपचार

मूत्रमार्गात पडद्याचा अडथळा (पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व्ह फलग्युरेशन) असल्याने मूत्रपिंडाची गंभीर समस्या उद्भवलेल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्यावर ससून रुग्णालयात लेझरद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर आहे. पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉ ल्व्ह हा जन्मदोष फक्त मुलांमध्ये दिसून येणारी समस्या आहे. पाच हजारांतील एका मुलात हा जन्मदोष आढळून येत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

गर्भाशयात असताना या चिमुकल्याला मूत्रपिंडाची समस्या असल्याचे निदान झाले होते. मात्र, पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जन्मानंतर वारंवार ताप येणे, लघवीतून पू येणे, लघवी करण्यात अडथळा निर्माण होत असल्याने जंतूसंसर्ग यासारख्या गंभीर समस्या उद्भवल्या होत्या. त्यामुळे या चिमुकल्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससूनमध्ये वैद्यकीय तपासण्या केल्या असता मूत्रमार्गात अडथळा निर्माण करणारा पडदा असल्याचे आढळून आले. यामुळे लघवी बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होत असल्याने मूत्रपिंडाला सूज आली होती. डाव्या बाजूला मूत्र असामान्यपणे उलट दिशेने वाहत असल्याने डावे मूत्रपिंडही काही प्रमाणात खराब झाले होते. मूत्रपिंड निकामी झाल्याने रक्तदाब वाढला होता. औषधांद्वारे रक्तदाब नियंत्रणात आल्यानंतर मूत्रमार्गातील पडदा लेझरशस्त्रक्रियेद्वारे कट करण्यात आला.

बालशल्यचिकित्सक डॉ. दसमित सिंह खोकर, बालरोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भोसले, डॉ. अनयना पटेल, परिचारिका विद्या मोरे, स्टाफ नर्स रसिका परब, सुनीता गीते, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. स्नेहा यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया पार पाडली. पेडियाट्रीक सर्जरी विभागातील डॉक्टर लहान मुलांवरील जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. देणगीद्वारे लेझर मशीन उपलब्ध झाल्याने सुविधा उपलब्ध झाल्या असल्याचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी सांगितले.