अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात लश्कर ए तोयबाचा दहशतवादी हबीबुल्लाह ठार

terrorist

पाकिस्तानमध्ये आता दहशतवाद्यांच्या खात्म्याचं सत्र सुरू झालं असून अनेक दहशतवादी आणि खलिस्तानवाद्यांना संपवण्यात येत आहे. या साखळीत आता अजून एका कुख्यात दहशतवाद्याचं नाव आलं आहे. लश्कर ए तोयबाचा दहशतवादी हबीबुल्लाह याला अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केलं आहे. कश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा सहभाग होता.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. या दहशतवाद्यांमध्ये बिलाल मुर्शीद, अकरम गाझी, अबू कासिम यांसारख्या क्रूरकर्म्यांचा समावेश आहे. याच दरम्यान, पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा प्रांतातून हबीबुल्लाहच्या हत्येची बातमी येत आहे.

हबीबुल्लाह हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याचा निकटवर्तीय होता. तसंच, 2016मध्ये झालेल्या उरी येथील हल्ल्यातही त्याचा प्रामुख्याने सहभाग होता. त्यानंतर हिंदुस्थानने सर्जिकल स्ट्राईक केला होता. रविवारी संध्याकाळी याच हबीबुल्लाहवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात हबीबुल्लाह जागीच ठार झाला.