विषप्रयोग कुणी केला माहीत होतं, पण पुरावा नव्हता; लता मंगेशकर यांनी सांगितलं खळबळजनक सत्य

अनादी आणि अनंत सूरांच्या धनी; अगणित संगीत रसिकांच्या हृदयांवर विराजमान झालेला अलौकिक स्वर म्हणजे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर! या सुमधूर गळ्यावर एकेकाळी विषप्रयोग झाला होता. हा विषप्रयोग कुणी केला, हे त्यावेळी लता मंगेशकर यांना कळलं होतं पण त्यांच्याकडे पुरावा नव्हता, असं खळबळजनक सत्य बाहेर आलंय. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लतादीदींनी हा खुलासा केला आहे.

लतादीदी म्हणाल्या, ही खूप जुनी गोष्ट आहे. 1963 सालची. आम्ही मंगेशकर कुटुंबीय त्याबद्दल बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती. त्यावेळी मी झोपून असायचे. मला भयंकर अशक्तपणा आला होता. मला उठून चालताही यायचं नाही. मी भविष्यात चालेन की नाही असाच प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता.’

त्याकाळात अनेक अफवांना पेव फुटलं होतं. लता मंगेशकर यापुढे कधीच गाऊ शकणार नाहीत, असे डॉक्टरांनी म्हटल्याचे अनेक ठिकाणी बोलले जात होते. पण प्रत्यक्षात त्यात काहीही तथ्य नसल्याचे दीदींनी मुलाखतीत स्पष्ट केले. दीदी म्हणाल्या की, आमच्यासाठी तो फारच वाईट काळ होता. पण मी गाऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी कधीच सांगितलं नाही. या सगळ्या अफवाच होत्या. उलट माझे डॉक्टर आर. पी. कपूर यांनी उत्तमरीत्या माझ्यावर उपचार केले. मी लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभी रहावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. पण इतकी वर्षे या घटनेबद्दल उठणाऱया अफवांवर मी सांगू इच्छिते की त्या प्रकरणानंतर मी माझा आवाज गमावला नाही.

तब्बल तीन महिने लतादीदी गादीला खिळून होत्या. मात्र त्यातून बाहेर पडायची त्यांची जिद्द आणि डॉक्टरांचे उपचार यामुळे त्या बऱया झाल्या आणि पुन्हा रेका@र्डिंग करू लागल्या.

कहीं दीप जले कहीं दिल
आजारातून उठल्यावर, काही काळ आराम केल्यानंतर लता मंगेशकर यांनी पुन्हा रेकॉर्डिंगला सुरुवात केली. संगीतकार हेमंतकुमार यांचा आग्रह होता की त्यांच्या एका चित्रपटासाठी लतादीदींनी गाणं गावं. दीदी म्हणाल्या, हेमंतदा तेव्हा माझ्या आईला भेटले. माझ्या आईने परवानगी दिली पण एक अटही घातली. मी गात असताना जराही ताण येतो आहे किंवा कोणताही त्रास होतो आहे असं जाणवलं तर मला तडक घरी सोडलं जावं. हेमंतकुमार यांनी ही अट मान्य केली. त्यानंतर मी ‘बीस साल बाद’ या सिनेमातील ‘कहीं दीप जले कहीं दिल’ हे गाणं गायलं असं लतादीदींनी सांगितले.

विषप्रयोग कुणी केला?
विषप्रयोग कुणी केला, या प्रश्नावर दीदी म्हणाल्या, माझ्यावर विषप्रयोग कुणी केला ते आम्हाला कळलं होतं. पण त्या व्यक्तीविरोधात आम्ही काहीही कारवाई केली नाही. कारण आमच्याकडे काही पुरावा नव्हता. पण त्यावेळी त्या माणसाच्या अशा वागण्याचं आम्हाला नवल वाटलं होतं, असं लतादीदी म्हणाल्या.

मजरुह सुलतानपुरी यांची आठवण
लता मंगेशकर यांनी गीतकार मजरुह सुलतानपुरी यांची आठवण काढली. दीदी आजारी आहेत हे कळल्यानंतर मजरुह सुलतानपुरी रोज सायंकाळी त्यांच्या घरी जात, त्यांची विचारपूस करत. दीदी म्हणाल्या, मजरुह साब त्यावेळी कमालीचे व्यस्त होते. त्यांना पुरेशी झोपही मिळत नसे. पण त्यातून वेळात वेळ काढून ते रोज मला भेटायला यायचे. मला कविता ऐकवत असत. त्यामुळे मला बरं वाटत होतं. अगदी माझ्यासाठी बनवलेलं साधं जेवण जेवायचे.

आपली प्रतिक्रिया द्या