
मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. पावसाचा हा वेग कायम राहिल्यास मांजरा, तावरजा व तेरणा नदीवरील प्रकल्प आणि कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे लवकरच निर्धारित पाणी पातळीपर्यंत भरतील, अशी शक्यता आहे. यामुळे प्रकल्पांमध्ये येणारे अतिरिक्त पाणी मांजरा, तेरणा आणि तावरजा नद्यांमार्फत सोडावे लागेल.
या पार्श्वभूमीवर मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीकाठावरील शेतकरी तसेच नदीकाठी वस्ती करणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक प्रवेश टाळावा, तसेच आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे रेणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे रेणापूर, जवळगा आणि खरोळा बंधाऱ्यांवरील पाणीपातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून, सध्या बंधाऱ्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे रेणा नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, रेणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि नदीकाठी वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सावध राहावे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.