पाणीटंचाईमुळे गणेशमूर्ती घरीच विसर्जन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

443

लातूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणीटंचाईची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पिण्याचे पाणी देणे ही मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे गणेश मूर्तीच्या विसर्जनाला पाणी नाही. तरी सर्व गणेश मंडळांनी त्यांच्याकडील गणेश मूर्तीचे विसर्जन न करता त्या मूर्ती स्वतःकडे सुरक्षित ठेवाव्यात अथवा प्रशासनाला दान कराव्यात. तसेच नागरिकांनी घरातल्या गणपतीचे घरीच बादलीत विसर्जन करावे अथवा मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करावी असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, नागरिकांनी घरातल्या गणपतीचे कुंडीमध्ये विसर्जन करून त्या कुंडीमध्ये वृक्ष लागवड करावी. तसेच पुढील वर्षीपासून मूर्तिकारांनीही पर्यावरणपूरक मूर्ती निर्माण कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. जी गणेश मंडळे मूर्ती विसर्जनासाठी जिल्ह्याबाहेर घेऊन जात असतील तर त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी त्या गणेश मंडळाची राहील, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले. लातूर शहरातील गणेश विसर्जनाच्या सर्व पारंपारिक ठिकाणी महापालिकेच्यावतीने गणेश मंडळाकडून मुर्त्या स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी गणेश मंडळांनी मिरवणूक झाल्यानंतर गणेशमूर्ती महापालिकेकडे द्याव्यात, असेही ते म्हणाले. पाणीटंचाईमुळे नागरिकांनी आणि मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि याबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांनीही सर्व गणेश मंडळांना मूर्ती विसर्जित न करण्याचे आवाहन करून मूर्ती स्वतःकडेच ठेवाव्यात अथवा प्रशासनाला तसेच मूर्तिकारांना दान कराव्यात असे आवाहन केले. प्रारंभी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी लातूर शहरात एकूण 317 गणेश मंडळे असून यातील 59 गणेश मंडळांनी मूर्ती स्वतःकडेच ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. तर 207 गणेश मंडळे प्रशासनाकडे मुर्त्या दान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत हे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपाध्यक्ष सचिन सांगळे, महापालिका उपायुक्त संभाजी वाघमारे यांच्यासह गणेश मंडळाचे अध्यक्ष, प्रतिनिधी व मूर्तिकार उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या