लातूरमध्ये दोन नगरसेवक फुटले, भाजपचे महापौरपद गेले

4969

उल्हासनगर महापालिकेपाठोपाठ लातूर महानगरपालिकेतही भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपला स्पष्ट बहुमत असणाऱ्या लातूर शहर महानगरपालिकेत आज सत्ताबदल झाला. काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विक्रांत गोजमगुंडे यांनी त्यांचे बंधू व भाजपाचे उमेदवार शैलेश गोजमगुंडे यांचा दोन मताने पराभव करुन विजयश्री खेचून आणली. भाजपाचे दोन सदस्य फुटले आणि काँग्रेसला थेट सत्तेचा लाभ झाला. भाजपातून फुटलेले चंद्रकांत बिराजदार यांना उपमहापौर पदाची संधी काँग्रेसच्या समर्थनामुळे प्राप्त झाली. या पराभवानंतर लातूरात भाजप कार्यालयात सन्नाटा पसरला आहे.

vikrant-gojamgunde-new-imag

लातूर शहर महानगर पालिकेत माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपाने थेट शुन्यातून स्पष्ट बहुमत प्राप्त केलेले होते. भाजपाचे 35 सदस्य सभागृहात होते. काँग्रेसचे 32 सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेला 1 सदस्य असे संख्याबळ होते. महापौर, उपमहापौर भाजपचाच होणार असे सर्वांना वाटलेले होते परंतू आजच्या निवडणूकीत भाजपाला जोरदार झटका बसला. भाजपाचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गिता गौड यांनी थेट काँग्रेसला समर्थन दिले.

भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार शैलेश गोजमगुंडे आणि काँग्रेसचे उमेदवार विक्रांत गोजमगुंडे या दोघांमध्येच लढत झाली. विक्रांत गोजमगुंडे यांना35 मते मिळाली तर शैलेश गोजमगुंडे यांना 33 मतांवर समाधान मानावे लागले. उपमहापौर पदाच्या निवडणूकीत चंद्रकांत बिराजदार यांचा 35 मतांनी विजय झाला तर भाग्यश्री कौळखेरे यांना 33 मतांवर समाधान मानावे लागले. लातूरात काँग्रेसने मोठा जल्लोष साजरा केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या