
लातूर येथील गांधी चौकातील शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयातून कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नातेवाईकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर चक्क एका रुग्णाचा अंत्यसंस्कारानंतर पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढवा लागला. या घटनेमुळे रुग्णालयाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील धोंडीराम तोंडारे यांचा मृत्यू झाला. त्याच प्रमाणे रेणापूर तालुक्यातील आबासाहेब चव्हाण यांचाही मृत्यू झाला होता. तोंडारे यांचे नातेवाईकांना रुग्णालयाने जो मृतदेह दिला तो न तपासताच ते घेऊन गेले. त्यांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार देखील केले. मात्र चव्हाण यांचे कुटुंबीय जेव्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांना धोंडीराम तोंडारे यांचा मृतदेह दिला. त्यांनी तो तपासताच त्यांना धक्का बसला. कारण तो मृतदेह आबासाहेब चव्हाण यांचा नव्हताच. त्यानंतर त्यांनी ही बाब रुग्णालयाच्या लक्षात आणून दिली. तेव्हा तोंडारे व चव्हाण यांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समजले. त्यानंतर चव्हाण यांच्या नातेवाईकांनी तोंडारे कुटुंबीयांकडे धाव घेतली. मात्र तो पर्यंत अंत्यसंस्कार उरकले होते.
त्यानंतर तोंडारे व चव्हाण कुटुंबीयांनी चव्हाण यांचा पुरलेला मृतदेह उकरून काढला. तो मृतदेह चव्हाण कुटुंबातील सदस्यांकडे सोपविण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली होती.






























































