लातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली, एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

1388

लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिनांक सहा जुलै रोजी पुन्हा 29 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाचशे च्या जवळ पोहोचली आहे. उपचारादरम्यान एका महिलेचा लातुरात मृत्यूही झाला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मृत्यू आणि कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दिनांक 6 जुलै रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत 180 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. पैकी 131 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 15 जणांचे अहवाल अनिर्णीत आले तर 07 जणांचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे प्रलंबित असलेले दोन्ही अहवाल पॉझिटिव आल्यामुळे पॉझिटिव रुग्णांची एकूण संख्या 29 ने वाढली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्णांची संख्या 499 वर पोहोचली आहे.

लातूर शहरांमध्ये काल पंधरा नवीन रुग्णांची भर पडली असून त्यामध्ये देशपांडे कॉलनी, इंडिया नगर, साळे गल्ली, एलआयसी कॉलनी, गांधीनगर, रामगिर नगर, जुना औसा रोड, नरसिंह नगर, महसूल कॉलनी, विशाल नगर, अवंती नगर, बोधे नगर, इंडिया नगर, वैद्यकीय महाविद्यालयातील एक तसेच लातूर एमआयडीसीतील चार रुग्णांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे देवणी तालुक्यातील एक उदगीर तालुक्यातील एक अमदपुर तालुक्यातील तीन तर निलंगा तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश यामध्ये आहे.

लातूर येथे कोरोनाग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
मागील 45 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. येथील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल असलेल्या 48 वर्षाच्या महिलेचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये कोरोना उपचारासाठी 48 वर्ष वय असलेल्या महिलेस दाखल करण्यात आलेले होते. या रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह व किडनीचा आजार होता व त्या मागील 45 दिवसापासून डायलिसीसवर होत्या. त्यांचा उपचारादरम्यान रात्री 10.00 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.

लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज वाढतच चालले आहेत. त्यासोबतच गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचा मृत्यूही वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा दर हा देशापेक्षा तसेच महाराष्ट्रात राज्यापेक्षा अधिक आहे आणि हीच लातूरकरांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या