हलणाऱ्या दीपमाळेसाठी प्रसिध्द असणारे रेणापूरचे श्री रेणूकामाता मंदिर

महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरे वेगवेगळया वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत. शिल्पकला, वास्तूकला, भव्यता यासोबतच काही ना काही वेगळे वैशिष्ट्य सांगितले जाते. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील श्री रेणूकामाता हे एक जागृत देवस्थान तर आहेतच परंतु येथील हलणारी दिपमाळ केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिध्द आहे. या मंदिराचे हे एक विलक्षण अनोखे वैशिष्ट्य आहे.

देवीच्या विविध रुपांमधील अनेक मंदिरे प्रसिध्द आहेत. देवीच्या साडेतीन शक्तिपीठासोबतच इतरही अनेक मंदिरे असून ते वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिध्द आहेत. लातूर जिल्ह्यातील लातूर पासून 20 कि.मी. अंतरावर असणाऱ्या रेणापूर येथील श्री रेणूकामाता मंदिरही असेच अतिशय प्राचिन मंदिर आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केलेला आहे. या मंदिराच्या स्थापनेची लोकवंदता म्हणजे गावातील एका बारवेत श्री रेणूकामातेची मूर्ती सापडली असे सांगितले जाते. त्यांनतर सध्याच्या मंदिरामध्येही मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. चालुक्यकालीन हे मंदिर आहे. जमदग्नी ऋषींचा आश्रम या भागात होता असेही म्हटले जाते. मात्र या संदर्भात काही संशोधन झाल्याचे दिसून येत नाही.

लातूर जिल्यातील नागरिकांसाठी श्री रेणूकामाता ही नवसाला पावणारी आणि जागृत आहे. नवरात्रीमध्ये या ठिकाणी मोठा उत्सव साजरा करण्यात येत असतो. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. विविध धार्मिक कार्यक्रम या काळात घेण्यात येतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी देवीची पालखी निघते. या दिवशी मोठी यात्रा भरवण्यात येत असते. मागील काही वर्षांपासून या मंदिरात दर्शनासाठी पायी येणाऱ्या भक्तांची संख्या वाढलेली आहे. लातूर शहरातून तसेच आजूबाजूच्या परिसरातून नागरिक पायी रेणूकामातेच्या दर्शनासाठी येत असल्याचे दिसून येते. पूर्वाभिमुख असणारे ही मंदिर आहे. महाद्वार मनमोहक आणि सुरेख दिसेल असे नंतर बांधलेले आहे. या महाद्वारामधून पुढे आले की सर्वप्रथम दिसते ते दिपमाळ आणि दिवा लावण्यासाठीची दगडी बांधकाम केलेली दीपमाळ.

अनोखी हलणारी दीपमाळ
श्री रेणूकामातेच्या मंदिरासमोर बांधकाम केलेली दीपमाळ आहे. सुमारे 35 फूट उंचीची ही दीपमाळ वीट आणि चुन्यामध्ये भरीव अशी बांधण्यात आलेली आहे. दीपमाळेच्या वरच्या बाजूस जाऊन ती हलवण्यात आली तर तळापासून ही दीपमाळ हलते. बांधकामाचे हे नेमके तंत्रज्ञान काय आहे याचा उलगडा मात्र आजही कोणाला झालेला नाही. या मंदिराच्या जवळ एक बारव होती परंतु ती बुजवण्यात आलेली आहे.