राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे असे सांगणाऱ्या वकिलाची माघार, परस्पर केला होता कोर्टात अर्ज

’लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे, अशी लेखी माहिती पुणे न्यायालयात देणारे अॅड. मिलिंद पवार यांनी हा दावा मागे घेतला आहे. राहुल गांधी यांच्याशी चर्चा न करता मी परस्पर हा अर्ज केला होता. हा अर्ज उद्या मागे घेणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामीच्या प्रकरणात राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यात खटला सुरू आहे. सत्यकी सावरकर यांनी हा खटला दाखल केला आहे. सत्यकी हे आजोळकडून नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांच्या घराण्यातील आहेत. तसे त्यांनी राहुल यांच्या विरोधात केलेल्या याचिकेतही नमूद केले आहे.

अॅड. पवार यांनी याच मुद्दय़ाच्या आधारे राहुल यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. ’तक्रारदाराच्या घराण्याचा इतिहास हिंसक आणि संविधानविरोधी कृत्याचा आहे. हे पाहता राहुल यांच्या जीवाला धोका आहे. न्यायालयाने याची दखल घेऊन प्रतिबंधात्मक संरक्षणाची व्यवस्था करावी. राज्य सरकारला तसे निर्देश द्यावेत, असे याचिकेत म्हटले होते. हा दावा करताना मतचोरी व अन्य राजकीय मुद्यांवर राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकांचाही हवाला पवार यांनी दिला होता.