दखल – बालकांच्या भावविश्वातला आनंद

>> लक्ष्मण वाल्डे

सुप्रसिद्ध कवी अय्युब पठाण लोहगावकर यांनी बालकवी म्हणूनही साहित्य क्षेत्रात ठसा उमटवल्याचे दिसून येते. ‘अंगत पंगत’ हा त्यांचा अत्यंत बहारदार आणि दर्जेदार असा पाचवा बालकवितासंग्रह आहे. ‘अंगत पंगत’ हा बालकवितासंग्रह संपूर्ण रंगीत चित्रांसह साकारलेला असून यामध्ये ‘जादूचे झाड’ ते ‘अंगत पंगत’ अशा एकूण एकापेक्षा एक सरस 36 बालकवितांचा समावेश केलेला आहे.

जी कविता मुलांना आवडते, ती कविता त्यांना पुनः पुन्हा वाचावीशी वाटते. अशी बालकविता गुणगुणण्यासाठी मुले नेहमीच उत्सुक असतात, परंतु अशी बालकविता लिहिणे सोपे नाही. यासाठी या कविता लिहिणाऱयाकडे मुलांच्या भावविश्वाचे पुरते भान आणि कवितेतील लय, ताल आणि नाद, गेयता यांची उत्तम जाण असायला हवी. अनेक वर्षे शिक्षक म्हणून मुलांच्या सहवासात रमणारे, मुलांचे भावविश्व जवळून अनुभवणारे अय्युब पठाण लोहगावकर हे त्यांच्या बालकवितेतून मुलांची आनंदाची बाग फुलविण्याचे काम अनेक वर्षे मनपूर्वक करीत आलेले आहेत.

‘मुले रंगली काव्यात’ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करून मुलांना कवितेची गोडी लावत आहेत. या संग्रहातील कवितेत बहरलेली बाग आहे, जादूचे झाड आहे, आमराईतून साद घालणारी कोकिळाताई आहे, तर दिवाळीच्या सणातली मौजमजा आहे. शाळा, फळा, सहल, बैलगाडी, मोबाइल हे मुलांच्या आवडीचे विषय हातात हात घालून कवितेतून आपल्याला भेटायला येतात, तर ‘संगणकदादा’, ‘पर्यावरण’, ‘मातृभूमी’, ‘कष्टाची शिकवण’, ‘वसा स्वच्छतेचा’, ‘कावळा’, ‘चिमणी’ या बालकविता मनोरंजनाबरोबरच नकळत चांगल्या विचारांची रुजवण करण्यास साह्यभूत ठरतात. एकूणच बालकवितेची रंगीत चित्रमय, सहजसोपी भाषा, नादमयता, रसपूर्ण आणि चमकदार आशय या गुणवैशिष्टय़ांमुळे कवितासंग्रह मुलांना नक्कीच आपलासा वाटेल.

कवितासंग्रहक्रप्ब् प्रत्येक शब्दातून कवीने भन्नाट जादूच केलेली दिसून येते. बालमनावर रुजणाऱया भावना कवीने या संपूर्ण बालकवितासंग्रहातून न्यायपूर्वक मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. हसत खेळत, सहज आपलीशी वाटावी अशी शब्दरचना, सोपी बोलीभाषा यातून कवीने बालमनाच्या भावना रेखाटल्या आहेत. या बालकविता म्हणजे बालमनाची काव्यफुलेच.

अंगत पंगत
लेखक ः अय्युब पठाण लोहगावकर
प्रकाशक ः लीला साहित्य प्रकाशन
पृष्ठे : 40, n मूल्य ः 140 रुपये