
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी नाट्यमय वळण मिळाले. कंपनीतून ” एक थेंबही बाहेर जात नाही ” असा दावा प्रशासन आणि संबंधितांकडून केला जात असतानाच कंपनीच्या गेटमधून बाहेर पडलेला भरलेला टँकर आंदोलकांनी पाठलाग करून सीईटीपीबाहेर पकडल्याने खळबळ उडाली. आंदोलकाचा आक्रमक पवित्रा पाहून सीईटीपी प्रभासनाने टँकर आतमध्ये न घेता तो परत कंपनीकडे पाठवला.
लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीमार्फत घातक पिफासचे उत्पादन होत असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात असून ही कंपनी बंद करावी या मागणीसाठी गेले कित्येक दिवस कोकण नागरी संघर्ष समितीमार्फत कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरु आहे. चिपळूण व खेड तालुक्यातील लोटे परिसरातील धामणदिवी, आंबडस, भेलसई, लोटे, गुणदे, आवाशी , चिरणी , घाणेखुंट, सोनगाव, कालुस्तेबुद्रुक आणि शेल्डी अशा एकूण अकरा ग्रामपंचायतींनी कंपनीविरोधात ठराव केल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. कंपनी बंद होईपर्यंत हा लढा सुरुच राहील, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पाठलाग करत टँकर पकडला
शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता कंपनीतून भरलेला टँकर बाहेर पडताना दिसतता आंदोलनकर्त्यांना संशय आला. टँकर पाणी सोडण्यासाठी आत जातो,मग भरलेलाच बाहेर कसा ? असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी टँकरचा पाठलाग केला हा टँकर खेडच्या दिशेने जात असताना लोटे एमआयडीसीतील सीईटीपीच्या बाहेर पोहोचल्याचे निदर्शनास आले. आंदोलकांचा वाढता रोष पाहता सीईटीपी प्रशासनाने टँकर आत घेण्यास नकार देत परत पाठवला.
कंपनी व्यवस्थापनला विचारला जाब
आंदोलकांनी टँकर पुन्हा कंपनीच्या गेटवर आणत व्यवस्थापनाला जाब विचारला. ‘एक थेंबही वेस्टेज बाहेर जात नाही” असे सांगितले जात होते. मग हे पाणी सीईटीपीमार्फत का सोडले जात होते, असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. यावेळी कंपनी व्यवस्थापन आणि आंदोलक स्थानिक ग्रामस्थ यांच्यात प्रचंड वादावादी झाली. यावेळी गंगाराम चाळके, शांताराम चाळके, नितीन कडू पंचायत समिती सदस्य अजय चाळके, मिलिंद कडू, नंदू काते, बाबुराव काते, सचिन काते, रोहन कालेकर, अन्वर खान, रवींद्र गोवळकर, कांचन चाळके, उदय घाग, राजेंद्र आंब्रे, सुबोध सावंतदेसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, घटनास्थळी खेड पोलीसही दाखल झाले.
‘ते’ दावे खोटे असल्याचा आरोप
कंपनीतून कोणतेही सांडपाणी बाहेर जात नाही. तसेच घनकचरा तळोजा येथे नेऊन त्याची विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा कंपनी व्यवस्थापन, मंत्री व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होता. मात्र शुक्रवारच्या टँकर प्रकरणानंतर हे दावे संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून ते खोटे ठरले असल्याचे आंदोलकांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
टँकर प्रकरण चिघळणार
कंपनी बंद करण्यासंदर्भात कोकण नागरी संघर्ष समितीकडून धरणे आंदोलन सुरू असतानाच ६ एप्रिल रोजी मोठा मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे, त्यातच आता या सर्व घडामोडीमुळे लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.



























































