स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणाऱया ‘लक्ष्मी’ लघुपटाचा जागतिक गौरव

सध्याच्या कोरोनाच्या संकटात आरोग्य सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित हे स्पष्ट झाले आहे. चांगल्या आरोग्यासाठी आपल्या घरात, आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्य आणि स्वच्छता याबाबत जनजागृतीसाठी नाशिकच्या हौशी कलाकाराने ‘लक्ष्मी’ नावाचा लघुपट तयार केला आहे. विशेष म्हणजे या लघुपटाने जागतिक स्तरावरील लघुपट स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

नाशिक येथील हौशी कलाकार प्रसाद देशपांडे यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या लक्ष्मी या लघुपटाला नवव्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट कॉन्फरन्समधील सुरक्षा आणि आरोग्य या विषयावरील लघुपट स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ सेफ्टी प्रोफेशनल या अमेरिकेतील नामांकित संस्थेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. राज्यातून हा एकमेव लघुपट या स्पर्धेत सहभागी झाला होता. विविध देशांतून सहभागी झालेल्या लघुपटांमधून ‘लक्ष्मी’ची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या लघुपटात एकही संवाद नाही.

एका खासगी पंपनीत सुरक्षा पर्यावरण आणि आरोग्य अधिकारी म्हणून काम करणारे प्रसाद देशपांडे हे चित्रपट क्षेत्रातील कोणतेही शिक्षण नसतानाही केवळ हौसेपोटी विविध सामाजिक विषयावर लघुपट बनवतात. 2015 साली नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी त्यांनी पाणी प्रदूषणावर ‘गंगा माँ का दर्द’ हा लघुपट तयार केला होता. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट लघुपट पुरस्कार मिळाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या