
अजित पवार गटाकडून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पह्डण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली ऑफर त्याला कारणीभूत मानली जात आहे. बाप-लेकीला सोडून इकडे या, अशी ऑफर तटकरेंनी राष्ट्रवादीच्या सात खासदारांना दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मात्र खासदारांनी ही ऑफर फेटाळून लावली असल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना सोडून अन्य खासदारांना अजितदादांकडे वळवण्याची जबाबदारी सुनील तटकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तटकरेंनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्लीत राष्ट्रवादीच्या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांना तशी ऑफर दिली. आमचा पक्ष घेतला, निशाणी घेतली, आता आमचे खासदारही पळवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आव्हाड यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार किंवा आमदारांना अजितदादा गटाने कितीही संपर्क साधला तरी त्यातील एकही फुटणार नाही, सर्वजण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत राहणार असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
तटकरेंनी ऑफर दिलीय, पण धुडकावली
सुनील तटकरे यांनी संपर्क साधलेल्या राष्ट्रवादीच्या सातही खासदारांनी त्यांच्या ऑफरबद्दल शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कानावर घातले. तटकरेंची ऑफर स्पष्टपणे धुडकावून लावल्याचेही त्यांनी सांगितल्याची माहिती आहे.
केंद्रात मंत्रिपदासाठीच खासदार फोडण्याचे प्रयत्न – संजय राऊत
अजित पवार गट केंद्रात मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रही आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार फुटत नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. केंद्रात मंत्रिपदासाठी जो कोटा आहे तो पूर्ण करा असे अजितदादा गटाला सांगण्यात आले आहे. तो कोटा पूर्ण केल्याशिवाय प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळणार नाही. त्यासाठी शरद पवारांचे खासदार फोडण्याचा प्रयत्न होत असेल, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले.
खरा कावा भाजपचा
राष्ट्रवादीचे खासदार फोडण्यामागचा खरा कावा भारतीय जनता पक्षाचा असल्याचे बोलले जात आहे. संसद अधिवेशनादरम्यान अजित पवार दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. मोदी सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंच्या पाठिंब्यावर सत्तेमध्ये आहे. त्यांना पाठिंब्याच्या जोरावर मोदी सरकारवर दबावाला वाव मिळू नये यासाठी भाजप अन्य पक्षांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहे. अजितदादांनीही शरद पवारांचे खासदार त्यादृष्टीने आपल्याकडे वळवावेत, त्यासाठी लागेल ती मदत करू असे अमित शहा यांनी त्या भेटीमध्ये अजितदादांना सांगितले. त्यानंतरच महाराष्ट्रात ‘ऑपरेशन घडय़ाळ’ सुरू झाले आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
सुप्रिया सुळेंनी फोन करून पटेलांना सुनावले
आपल्या खासदारांनी तटकरेंच्या ऑफरबद्दल माहिती देताच सुप्रिया सुळे भयंकर संतापल्या. त्यांनी अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना फोन केला. पुन्हा आमचा पक्ष फोडयला उठलात का, अशा तीव्र शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते.






























































